पुण्यातील रेल्वे ट्रॅकवर ‘आयबी’ची नजर!

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशात सणासुदीचा काळ सुरू झाला असून सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. यादरम्यान दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असतात. अशातच पुण्यातील रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणेकडून रेल्वे प्रशासनाला काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्याची बाब समोर आले आहे.

रेल्वे ट्रॅकवरील घातपात कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात सुमारे 20 ठिकाणी ट्रॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तसेच, रेल्वे इंजिनमध्येदेखील कॅमेरे बसविले जाणार आहेत. रेल्वेच्या सुरक्षा बलाची नुकतीच केंद्रीय गुप्तचर विभागासोबत (आयबी) बैठक झाली असून त्या पार्श्‍वभूमीवर ‘आयबी’ने रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ‘आयबी’ने रेल्वे प्रशासनाला संशयित ठिकाणे सांगितली असून, त्याठिकाणी प्रामुख्याने कॅमेरे बसविले जाणार आहेत. जेणेकरून घातपाताच्या कारवाई वेळीच रोखता येतील. यासोबतच संवेदनशिल भागात गस्त देखील वाढवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसचा अपघात करण्यासाठी ट्रॅकवर गॅस सिलिंडर, पेट्रोलने भरलेली बाटली आणि एका पिशवीत ज्वलनशील पदार्थ आढळून आले. यात घातपाताचा संशय असल्याने राष्ट्रीय तपास संस्थाने (एनआयए) तपास सुरु केला आहे. तर काही दिवसापूर्वी सोलापूर विभागातील कुर्डुवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात करण्यासाठी काही व्यक्तींनी रेल्वे ट्रॅकवर सुमारे 230 किलोचे ‘स्लीपर’ ठेवले होते. सुदैवाने गँगमनने वेळीच हे पाहिल्याने त्याने स्लीपर ट्रॅकवरून हटविले. अन्यथा रेल्वे अपघाताची शक्यता नाकारता आली नसती. अशाच स्वरूपाच्या कारवाया पुण्यातदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आयबी’ने रेल्वे प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version