निरबाडे जि.प.शाळेला आदर्श पुरस्कार

। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरबाडे-1 या शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषद कडून सन 2021-22 साठी वरिष्ठ प्राथमिक शाळा स्तरातील आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबाबत शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तथा पालक वर्ग यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरणाक, विस्तार अधिकारी सावर्डेकर, राजअहमद देसाई, केंद्रप्रमुख मोरे सर यांनी शाळेचे अभिनंदन तसेच कौतुक केले आहे.
या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले असून, वरिष्ठ गटासाठी 17 शाळांचे प्रस्ताव आले होते. यापैकी दाखल पात्र मुले, उपस्थितीचे शेकडा प्रमाण, शाळा सिद्धी, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने राबविलेले उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अमलबजावणी आदी निकषाचा विचार करुन एकूण 10 शाळांची निवड करण्यात आली.
याकामी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र महाडिक, उपाध्यक्ष विक्रम महाडिक तसेच सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुनीता सूर्यवंशी , पदवीधर शिक्षिका राजश्री जंगम, उपशिक्षका संजना गुजर, उपशिक्षिका अश्‍विनी माळेकर-पिलके यांचे विशेष योगदान असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शाळेला मिळालेला हा पुरस्कार फक्त शाळेचा नसून, गावाचा आहे. शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार असल्याचा मानस शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे.

Exit mobile version