टोकण भातलागवड कोकणासाठी आदर्शवत

उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांचे मत
| पोलादपूर | प्रतिनिधी |
कोकणामध्ये वाढते स्थलांतर व भातशेतीमध्ये मजुरांची कमतरता असल्याकारणाने ओस पडलेली भातशेती सामूहिक पद्धतीने एकत्र येत टोकण यंत्राचा वापर करून केलेली भातशेती लागवड कोकणासाठी आदर्शवत आहे, असे मत महाड उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी व्यक्त केले. गुरुमाऊली शेतकरी गट देवपूर यांनी या पद्धतीने शेती केली आहे.

या प्रात्यक्षिक व क्षेत्रीय भेट कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नागनाथ घरत, पैठण मंडळ कृषी अधिकारी सूरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहाय्यक मनोज जाधव, गुरूमाउली शेतकरी गट अध्यक्ष जगदीश महाडिक, सचिव महादेव शिंदे, ज्ञानेश्‍वर पवार, चंद्रकांत शिंदे, बाबाराम चव्हाण, तुळशीराम पवार, चंद्रकांत पवार, विठोबा महाडिक व शेतकरी उपस्थित होते.

बालाजी ताटे यांनी मार्गदर्शन करताना, उपस्थित शेतकर्‍यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत भातशेती अधिक उत्पादनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन, वेळेवर रोग किडीचे नियंत्रण करावे, असे आवाहन केले. कमी खर्च, कमी श्रम, अधिक उत्पादन याकरिता यंत्राच्या साह्याने केलेली भात टोकण पद्धत कोकणातील पडीक भात शेती लागवडीखाली आणण्यासाठी वरदान ठरेल, असे मत व्यक्त केले व टोकण भातलागवड तंत्रज्ञान इतर तालुक्यातील शेतकर्‍यांना अवगत व्हावे म्हणून प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

प्रभारी तालुका कृषी अधिकारी नागनाथ घरत यांनी युरिया ब्रिकेट वापर व फायदे याबाबतीत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी सूरज पाटील यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी ठोंब पद्धतीने नाचणी लागवड प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी, तर आभार जगदीश महाडिक यांनी केले.

Exit mobile version