ऑक्सिजन पार्कमधील झाडांना बोधवाक्यांतून ओळख

| उरण | वार्ताहर |

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमधील प्रत्येक झाडाला बोधवाक्य देऊन त्यांना नवी ओळख देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या पार्कमध्ये फिरताना एक वेगळीच अनुभूती प्राप्त होणार आहे. शिवाय पर्यावरणविषयक जनजागृतीमुळे निसर्गज्ञानातही भर पडणार आहे.

सारडे विकास मंचतर्फे निर्माण केलेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये झाडांना एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तब्बल दहा वर्षांच्या मेहनतीनंतर रोपट्यांच्या संगोपनानंतर झाडे बहरली असून ती पार्कमध्ये डौलाने उभी राहिली आहेत. दहा वर्षांत वाढलेल्या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी येऊ लागले आहेत. त्यांचा अधिवास तेथे वाढला आहे. त्याचप्रमाणे हे पार्क पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढादेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बोधवाक्ये लावण्यासाठी निवास गावंड, सुभाष म्हात्रे, सदाबहार दोस्ती ग्रुपचे हरिश्चंद्र म्हात्रे, तुकाराम गावंड, कैलास पाटील, अरुण म्हात्रे, संतोष जोशी, सचिन पाटील, निसर्गप्रेमी सागर पाटील, प्रेम म्हात्रे, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे आदी सर्वांनी सहकार्य केले. किशोर जयवंत म्हात्रे तसेच प्रिंटिंगसाठी साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश पाटील यांचे सहकार्य लाभले. सारडे विकास मंच तसेच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडेचे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

निसर्गाचे रक्षण हेच खरे मूल्यशिक्षण
ऑक्सिजन पार्क परिसरात निसर्ग भटकंती करत असताना झाडांवर ‌‘निसर्ग असेल हिरवा तर नको ऑक्सिजनची पर्वा', ‌‘निसर्ग ठेवा स्वच्छ, सुंदर फळ मिळेल गोड नंतर', ‌‘निसर्गाचे रक्षण हेच खरे मूल्यशिक्षण', ‌‘वसुंधरा आपली माता जतन करा तिचे आता' अशा प्रकारची अनेक बोधवाक्ये प्रत्येक झाडावर लिहिली आहेत. अशा प्रत्येक झाडावर बोधवाक्य लावण्याचे काम करण्यात आले. बोधवाक्यासाठी पानदिवे गावचे श्याम मोकाशी तसेच आदर्श शिक्षक एन. डी. म्हात्रे यांनी आर्थिक मदत केली आहे.
Exit mobile version