सरपंच स्वाती पाटील यांचे सुतोवाच
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत तर्फे परिसरातील महिलांसाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रश्नमंजुषा, विविध खेळ या माध्यमातून होम मिनिस्टर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच स्वाती पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व उपसरपंच प्रणिता म्हात्रे, पंचायत समिती उपसभापती मिनल माळी व इतर महिला सदस्यांनी दीप प्रज्वलित करून केले.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच स्वाती पाटील यांनी सांगितले की, स्री सक्षम झाली की देश भक्कम होतो म्हणून महिलांनी आपली सुप्त वैशिष्ट्ये ओळखून स्वतःला सर्वांग सुंदर बनवा व देश घडवा. तसेच पंचायत समिती उपसभापती मिनल माळी यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी कोणत्याच क्षेत्रात मागे न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात प्रथम चेंढरे येथील रहिवासी रेश्मा डफळ यांना कुस्ती क्षेत्रातील क्रिडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकताच रायगड भूषण पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल चेंढरे ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर होम मिनिस्टर स्पर्धेला सुरवात केली. या स्पर्धेत सुमारे 130 महिलांनी विविध खेळ स्पर्धा व प्रश्नमंजुषा यांची अडथळा शर्यत पार करून शेवटी विजेत्या ठरलेल्या दहा महिलांना पारितोषिके देण्यात आली त्यातून अंतिम विजेत्या तीन महिलांना पैठणी देऊन सरपंच व उपसरपंच व इतर सदस्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, पंचायत समिती उपसभापती मिनल माळी, सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, सदस्या लीना आंबेतकर, शुभांगी महाडिक, ममता मानकर, अस्मिता म्हात्रे, अहिल्या पाटील, अनिता शेंडे, स्मिता घरत, शर्मिला पाटील, मीना नाईक व इतर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.