ई-रिक्षा सुरू न झाल्यास उपोषण

पालकांचा आक्रमक पवित्रा
| माथेरान | वार्ताहर |
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ई-रिक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरल्या होत्या. सहा किलोमीटर ई-रिक्षातून जाताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसायचा. परंतु, ई-रिक्षा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ई-रिक्षा लवकरात लवकर सुरू करा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करणार, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी तथा सनियंत्रण समितीचे मानद सचिव तसेच माथेरान पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 12 मे 2022 ला पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने येथे तीन महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट्ही यशस्वी केला. दरम्यान, 12 मे च्या आदेशात स्पष्ट केले होते की, पायलट प्रोजेक्ट्नंतर ई-रिक्षा कशा पद्धतीने सुरू करणार याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी. तसेच ई-रिक्षा बंद करण्याचे येथे कोणतेही आदेश ही दिले नाहीत.

ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट् पालिकेकडून 4 मार्च रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून आजपर्यंत सहा महिन्यांचा काळ उलटूनही प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले नाही. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. के.जी.च्या लहानग्यांपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सेंट झेव्हीयर आणि गव्हाणकर शाळेच्या विद्यार्थ्यांना दररोज चार ते पाच किलोमीटर चालावे लागत आहे. हे सर्व अन्यायकारक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्य सरकार आणि सनियंत्रण समितीचे लक्ष वेधण्यासाठी पालक चंद्रकांत सुतार, केतन रामाणे, आदेश घाग, संतोष पवार, आदित्य भिलारे, नंदू चव्हाण, शैलेश भोसले व हरिभाऊ लबडे हे मंगळवार, दि 12 सप्टेंबरपासून संविधानिक मार्गाने येथील मध्यवर्ती ठिकाण श्रीराम चौक येथे बेमुदत उपोषणास बसणार आहेत. अशा आशयाचे पत्र माथेरानमधील सर्व शासकीय कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी तथा सनियंत्रण समिती मानद सचिव डॉ. योगेश म्हसे यांना देण्यात आले आहे. दरम्यान, माथेरानमधील महिलादेखील उपोषणाला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version