‘पीएसएमएस’ मान्यता रद्द केल्यास हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची पालकांची मागणी
। पेण। प्रतिनिधी ।

पी.एस.एम.एस. या संस्थेच्या चुकीच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. पालकांच्या इच्छेविरुद्ध व शासनाची मान्यता नसताना खासगी लिड अ‍ॅप सुरु करुन या संस्थेने शासनाच्या नियमांची पायमल्ली केली. तसेच शासनाने दिलेल्या अभ्यासक्रामाव्यतिरिक्त खासगी अ‍ॅप सुरु ठेवण्यास शासन परवानगी देत नसल्याने शासनाच्या नियमांचे भंग केल्याचा गुन्हा संस्थेवर सिद्ध झाल्यास संस्थेची मान्यता रद्द केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गटशिक्षण अधिकारी अरूणादेवी मोरे यांनी गुरुवारी (दि. 21) पी.एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, पेण (गुरूकुल) या संस्थेने केलेल्या कृत्याचा अहवाल शिक्षण अधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांच्याकडे पाठविला. त्यामध्ये आरटीई अंतर्गत येणार्‍या सवलतधारक मुलांचे पैसे परत न केल्याबाबत तसेच शासन नियमात नसतानादेखील या संस्थेने स्वतःच्या मर्जीने खासगी लिड अ‍ॅप पालकांचा विरोध असताना सुरु करीत त्याबदल्यात पालकांकडून 3600 रुपये घेतले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वारंवार सांगूनही लिड अ‍ॅप बंद केले नाही. तसेच दहावीच्या मुलांसाठी शिक्षण संस्थेच्याच संकुलामध्ये खासगी क्लासेस चालू करुन पालकांजवळून जास्तीचे 4000 रुपये घेतल्याबाबतचे आरोप गटशिक्षण अधिकार्‍यांनी नमूद केले आहेत.
गटशिक्षण अधिकार्‍यांनी घेतलेल्या माहितीनुसार व पाठविलेल्या अहवालानूसार या संस्थेची मान्यता रद्द होऊ शकते. असे झाल्यास हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. परिणामी, संस्था चालकांच्या बेजबाबदारपणाचा फटका पालकांसह विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. या बाबीचा विचार करुन पालक, संस्थाचालक व मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या संस्थेबाबत गटशिक्षण अधिकारी अरुणादेवी मोरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. तसेच, संस्थाचालक येऊन भेटून गेले. मात्र, गटशिक्षण अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानूसार संस्था दोषी असल्यास प्रथम संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आर्थिक घोटाळा झाला असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पुनीता गुरव, शिक्षण अधिकारी
Exit mobile version