। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटी कर्मचार्यांनी संप मागे न घेतल्यास सरकारतर्फे नवीन कर्मचारी भरती केली जाईल,असा इशारा परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यानी दिला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास 2016,2017 आणि 2019च्या भरतीमधील प्रतिक्षा यादीतील लोकांना भरती करून घ्यावे लागेल असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.
राज्य परिवहन महामंडळाचं शासनात विलीनीकरण करा ही मागणी घेऊन राज्यातील एसटी कर्मचारी सध्या संपावर आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाननंतर आता सरकारकडून कर्मचार्यांविरुद्ध देखील कठोर कारवाई केली जात असल्याचं दिसतं आहे. संपावर असेलेल्या दोन हजार पेक्षा जास्त कर्मचार्यांना काल हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यांनंतर आता अनिल परब यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील वेगवेळ्या आगारातील दोन हजारांवर कर्मचार्यांना एसटीने अल्टीमेटम दिलं होतं. त्यापूर्वी काही कर्मचार्यांना निलंबित देखील करण्यात आलं आहे.
आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील.
अनिल परब,परिवहन मंत्री
वेतन करार करण्यास तयार
सरकार कामगारांच्या वेतनाचा करार करण्यास तयार आहे. संप कधी संपणार याचे उत्तर त्यांच्याकडे आहे. आडमुठेपणा ठेवल्यास सर्वांचेच नुकसान होतंय. नेतृत्व करणार्यांचे कामगार ऐकत नाहीत की ते समजवत नाहीत. हे कळत नाहीये, असा चिमटाही त्यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना काढला. हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.