कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ

मागण्या मान्य न झाल्यास सागरी जनआंदोलनाचा इशारा
कोळी महाशक्ती संघाचे अध्यक्ष पंकज बने घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

| कोर्लई | वार्ताहर |

राज्य सरकारने सन 2001 मध्ये विधायक नं. 23 पास करून कोळी समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे असंख्य कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ असून, विद्यमान भाजप सरकार यात जातीने लक्ष घालून योग्य तो न्याय मिळवून देईल का, असा सवाल अखिल भारतीय कोळी शक्ती महासंघाचे अध्यक्ष पंकज बने यांनी विचारला आहे. याबाबत आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर करणार असल्याचे, तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सागरी जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत कोळी समाजाला एस.टी. शेड्युल ट्रँपचा दर्जा दिलेला होता. परंतु सन 2001 मध्ये सरकारने विधायक नं. 23 पारीत करुन कोळी समाजाला संकटांच्या खाईत टाकले आहे. विधिमंडळात विधायक नं.23 पास झाले तेव्हा सभागृहातील आमदारांनी त्या विधेयकावर एकमुखी ठराव करून सह्या केल्या. त्यामुळे हजारो कोळी बांधवांच्या सरकारी नोकर्‍या धोक्यात आल्या. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. या विधेयकामुळे समाज बांधवांच्या विकासाला खीळ बसली. कोळी बांधवांना यापासून योग्य न्याय मिळावा, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महासंघातर्फे निवेदन देण्यात येणार असल्याचे पंकज बने यांनी सांगितले.

Exit mobile version