रस्त्याचे काम न केल्यास ‘त्या’ कंपनीचे श्राद्ध घालणार ; शेकापचे युवा नेते निलेश थोरे आक्रमक

माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे रोजच नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे,6 ऑगस्ट रोजी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातामध्ये जिगरबाज पोलीस अधिकारी कै.विशाल येलवे व शेकाप कार्यकर्त्या कै.उषा नामदेव शिंदे यांचे निधन झाले, खड्ड्यामुळे होणारे अपघात हे अपघात नसून घातपात आहेत त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी असल्याचे शेकापचे युवा नेते निलेश थोरे यांनी प्रस्तुत पत्रकाराना सांगितले.

गेले वर्षानुवर्षे महामार्गाचे काम चालूच असताना आतापर्यंत शेकडो लोकांना जीव गमावावे लागले आहेत तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत असे असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी कुणीही आवाज उठवत नाहीत,माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या सुचनेनुसार सदरच्या मृत व्यक्तींचे उत्तरकार्य होण्याच्या आत जर रस्त्याचे खड्डे भरून वाहतूकीलायक रस्ता न झाल्यास 19 ऑगस्ट रोजी चेतक कंपनीच्या प्लांट माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकर्ते व पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेसमवेत 2000 लोकांचा जनसमुदाय घेऊन घेराव घालू व जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत कुणालाही कंपनीमधून बाहेर पडून देणार नाही असा इशारा शेकाप युवा नेते निलेश थोरे यांनी दिला आहे.जनतेला होणाऱ्या त्रासामुळे ते कमालीचे संतप्त झाले असून वेळेवर कारवाई न केल्यास कंपनीचेच श्राद्ध घालण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे,त्यामुळे आतातरी माणगाव तालुक्यातील जनतेला वाहतुकीलायक रस्ता मिळेल अश्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे दिसत आहे, कोरोना परिस्थिती मुळे जमावबंदी लागू आहे पण जर जमाव च शिल्लक राहिला नाही तर जमावबंदी करणार कुणाची? त्यामुळे कंपनीने जर मुजोरी सोडलीच नाही तर मात्र नाईलाजाने हे जनआंदोलन उग्र करावेच लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version