आभाळ पुन्हा फाटल्यास महापूर येणार

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
शहराच्या चारही बाजूने डोंगर आणि मध्येच वसलेले शहर म्हणजे बशीच्या आकारासारखी चिपळूण शहराची रचना आहे. पूर्वी डोंगरातून येणारे पावसाचे पाणी शहरातील तलाव आणि पाणथळी भागात साचायचे. तलाव भरल्यानंतर हळूहळू पाणी बाहेर येऊन वाशिष्ठी नदीकडे जायचे; मात्र आता तलाव शिल्लक नाहीत. पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गावर सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. त्यामुळे पंधरा मिनिटाच्या मुसळधार पावसानंतर शहरात पाणी भरते. पाणथळी बुजवल्यानंतर ही समस्या आणखी तीव्र होण्याचा धोका आहे.
पाणी अडवणे, जिरवणे हे पाणथळांकडून होते. पावसाचे महापुराचे पाणी तसेच वस्तीतून येणारे सांडपाणी येथे साचते. त्या वेळी त्या पाण्याचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बदलतात. विषारी जीवाणूची तीव्रता कमी होते. शुद्ध पाणी वाहून पुढे जाते आणि उर्वरित पाणी जमिनीत मुरते किंवा त्याची वाफ होते. त्यामुळे एकप्रकारे शहरातील पाणी शुद्धीकरणाचे काम पाणथळ जागा करतात.
पाणथळ जागा या अन्नसाखळीतील महत्त्वाची परिसंस्था आहे. अनेक जलचर, उभयचर प्राण्यांसह कीटक, पक्षी व त्यावर अवलंबून असलेले अनेक पाणीजातीचे पाणथळे अधिवास आहेत. कित्येक मत्स्य व जलचर प्राणी, बेडकासारखे उभयवर प्राणी, अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, अनेक प्रजातीचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी येथे येतात. त्यामुळे हे सर्व प्रजातीची जी अन्नासाखळी आहे, ती अबाधित राखण्याचे काम पाणथळे करत असतात. ते खाण्यासाठी किटकांची उत्पत्ती होते. शेतातील परागीभवनामध्ये किटकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. त्यामुळे अन्नधान्य निर्मितीमध्ये कीटक उपयोगी आहेत. या किटकांवर अनेक पक्षी उपजीविका करतात. त्यामुळे शेतातील धान्यही वाचते. कीटक हे उपद्रवी व उपयोगी असे काम करतात.
पाणी भरण्याचा प्रश्‍न कायम
शहरातील जुन्या घरांच्या ठिकाणी अपार्टमेंट बांधून त्या भोवती संरक्षण भिंती बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा वेळेवर होत नाही. शहरातील सखल भागात मातीचा भराव टाकल्यामुळे साचणारे पाणी रस्त्यावर आणि लोकवस्त्यांमध्ये साचणार आहे. त्यामुळे शहरात पाणी भरण्याचा प्रश्‍न कायम राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version