संमेलनाध्यक्ष शोभणे यांचा सरकारला इशारा
| अमळनेर | वृत्तसंस्था |
बेरोजगारीचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असती. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा थेट शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी सरकारला इशारा दिला.
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन शुक्रवारी अमळनेर येथे झाले. यावेळी शोभणे अध्यक्ष पदावरून बोलत होते. या संमेलनाला लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे व महामंडळाचे सर्व पदाधिकारी, आयोजक उपस्थित होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणाले, शिक्षण क्षेत्रात आता आपल्याला काहीही करायचे नाही, असे ठरवून सरकारने या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत तर दुसरीकडे आज हजारो उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत म्हातारे झाले आहेत. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात. असा खडा सवालही शोभणे यांनी केला.
प्राचीन काळी धर्म सर्वोच्चपदी होता. धर्मसत्ताक राज्ये ही धर्माची वेगळी गरज म्हणून निर्माण झाली. पुढे राजसत्तेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देत धर्मसत्तेलाच आपल्या अंकित ठेवले.पुढे हाच राजा सर्वोच्च समजला जाऊ लागला, धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला, इतिहासाची हीच चक्रे आता पुन्हा नव्या रूपाने फिरू लागली आहेत, याकडेही शोभणे यांनी आपल्या भाषणात आवर्जुन लक्ष वेधले.