एकत्र आलो, एकजूट झालो, तर न झुकणाऱ्यांनाही झुकवता येते: ॲड. साम्या कोरडे

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

“विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य जनतेची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद आहे. आपण एकत्र आलो, संघटित झालो, तर कितीही मोठी आणि न झुकणारी व्यवस्था असली तरी तिलाही झुकवता येते, हे देशातील विद्यार्थ्यांनी अलीकडील आंदोलनातून सिद्ध करून दाखवले आहे,“ असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. साम्या कोरडे यांनी केले.

शेकापच्या 79 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना कोरडे म्हणाल्या, “आज देशातील वातावरण पाहता, या ऐतिहासिक वर्धापनदिनी माझ्या हस्ते लाल ध्वज फडकावण्याचा मान मला देऊन भाई जयंत पाटील आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मी आयुष्यभर विसरणार नाही. हा सन्मान केवळ माझा नसून विद्यार्थी चळवळीचा आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन लढण्याची परंपरा शेतकरी कामगार पक्षाची आहे. विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या न्याय हक्कांसाठी लाल बावटा नेहमीच अग्रभागी राहिला आहे. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट ही लोकशक्तीचे मोठे उदाहरण ठरली. त्या लढ्यात लाल बावट्याचाही सक्रिय सहभाग होता, याचा मला अभिमान आहे.”

“संघर्ष आणि न्यायाचा वारसा हा शेकापने आम्हाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे जगात, देशात किंवा राज्यात जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे हा लाल बावटा अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहील. अन्यायाविरोधात आवाज उठवणे हीच शेकापची ओळख आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे अधिक ताकदीने चालवत राहू,” असेही कोरडे यांनी ठामपणे सांगितले.

Exit mobile version