शहाणे असाल तर कोर्टाची पायरी चढा…!

| पनवेल | प्रतिनिधी |
‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ ही म्हण चुकीची ठरवून, याउलट ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढावी’ असेच म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे, आपल्या जीवनातील अडीअडचणी, समस्या, वादविवाद तसेच विविध प्रश्‍न भांडणतंटे करूनच सोडवायला हवेत असे काही नाही. उलटपक्षी, कायदा तज्ज्ञाकडून ते प्रश्‍न सोडवून घ्यावेत. जर उच्चशिक्षित न्यायाधीश आणि वकील दररोज कोर्टात येतात, तर मग शहाण्या माणसाने का येऊ नये? त्यामुळे आता ही म्हण बदलून ‘जर शहाणे असाल, तर कोर्टातच या’ याप्रमाणे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांनी केले. त्या पनवेल तहसीलदार कार्यालय येथे आयोजित केलेल्या पॅन इंडिया अवेरनेस कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शासनाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात यशस्वीपणे टाकलेले हे पहिले पाऊल आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या सहकार्यामुळे गेले 45 दिवस हा उपक्रम योग्यरीतीने पार पडला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड यांच्या आदेशानुसार दि.2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती ते दि.14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरु जयंती- बालदिनापर्यंत पॅन इंडिया अवेरनेस अंतर्गत विधी सेवा प्राधिकरणाचे भारतभर जनजागृती अभियान व पोहोच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली व पनवेल बार असोसिएशनच्या समन्वयाने, अमिटी लॉ कॉलेज पनवेल, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा, टीएमव्ही महाविद्यालय खारघर आणि केएलई लॉ कॉलेज कळंबोली यांच्या सहभागाने पनवेल तालुक्यामध्ये मागील 45 दिवसांच्या कालावधीत गावोगावी, ग्रामपंचायत ठिकाणी, तसेच विद्यालय, महाविद्यालय अशा विविध ठिकाणी मोफत विधी सेवा प्राधिकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम आज (रविवार दि.14 नोव्हेंबर) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पनवेल, न्यायाधीश कनिष्ठ स्तर पनवेल, तहसीलदार विजय तळेकर, पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. एस. भाकरे, साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version