रुची भगत खारेपाटातील पहिली न्यायाधीश
। जीवन पाटील । भाकरवड ।
परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची जोड असल्यास कोणत्याही परिस्थितीवर मात करणे शक्य असते, असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाधी न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर या गावातील मुलीने घवघवीत यश संपादित केले आहे. रुची सुधा भगत असे या मुलीचे नाव आहे. रुची ही अवघ्या 25 वर्षांची असून, इतक्या कमी वयात न्यायाधीश बनणारी खारेपाटातील पहिलीच मुलगी ठरली आहे.
रुची भगत ही जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबागची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मुंबईत शासकीय महाविद्यालयात वकील होण्यासाठी प्रवेश घेतला व त्यानंतर बंगलोरमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या मनोगतात श्री राजन भगत यांनी सांगितले की कोर्टाची पायरी न चढता पुस्तकांच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन एक आगरी मुलगी न्यायाधीश बनते, ही खारेपाटातील उल्लेखनिय बाब आहे, तिने आईचे स्वप्न पूर्ण केले आहे.
राजन भगत जे आपल्या कुमारवयात 11 वी/12 वीचेे क्लास घ्यायचे. खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यांनी त्यांचे आयुष्य सामाजिक कार्यासाठी व्यतित करायचे ठरवले. शहापूर-धेरंड खलाटीत रिलायन्स-टाटा व तत्समसारख्या पर्यावरण व मानवघातक उद्योगांना इथल्या खार्या मातीत गाढण्याचे काम ज्या शहापूर-धेरंड नऊ गाव खारेपाट बचाव कृती संघर्ष समितीचे महत्त्वाचे नेते ते आहेत. अतिशय हुशार, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व. भारतात आंदोलनाकर्त्यांचे ज्या प्रमुख नेत्यांमध्ये नाव गणले जाते त्या डॉ. भारत पाटणकर यांच्या आंदोलनकर्त्यांतील ते शिष्य आहेत. स्वत:ची पत्नी कॅन्सरग्रस्त असूनही ते कोणत्याही प्रलोभनांना न घाबरता एकीकडे पत्नीचा आजार व दुसरीकडे आपल्या कन्येचे शिक्षण सांभाळत हा समाजसेवेचा वसा अविरतपणे चालू ठेवला आहे. दुर्दैवाने त्यांची पत्नी वाचू शकली नाही. हे दु:ख त्यांना सलतच आहे. अगदी शांततेच्या मार्गाने अन्यायाविरूद्ध लढा देताना कायदेशीर बाबींचा मागोवा घेत ते शेतकरीहितासाठी लढत आहेत.
रुचीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा सत्कार समारंभ येथील न्यू अष्टविनायक क्रिकेट क्लब आदर्श नगर शहापूर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.
एमपीएससी, यूपीएससी, कोणत्याही प्रकारच्या परीक्षेबद्दल संघर्ष काय असतो आणि जो न्यायासाठी लढतो, त्याची अन्यायाची जाणीव काय असते, याची पूर्ण जाणीव मला आहे. कारण संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजला होता. आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत कमी लेखू नका. त्यांना त्यांच्या आवडीनुसार मार्गदर्शन करावे. – रुची भगत, न्यायाधीश