हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान

| मुंबई | प्रतिनिधी |
ईडी,सीबीआयची धमकी आम्हाल देऊ नका, हिम्मत असेल तर सामोरे या आणि माझे सरकार पाडून दाखवा, असा खरमरीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दिला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली.गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेल्या ईडी आणि तत्सम केंद्रीय यत्रणांच्या धाडींवर देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली आहे. बाबरी मशिद प्रकरणानंतर सर्वजण घरात लपून बसले होते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा समोर येऊन गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा दिली होती असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली. तसंच 1992 साली झालेल्या दंगलीत शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली असंही ते पुढे म्हणाले. हिंदूत्वावर बोलताना त्यांनी यावेळी आमचं हिंदूत्व हे माय मरो पण बाप जगो असं हिंदूत्व नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली.

लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना मारलं
लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिवसा ढवळ्या शेतकर्‍यांना मारल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मोहन भागवत यांच्या मसर्वांचे पूर्वज हिंदू असल्याच्याफ विधानाची आठवण करून देताना उद्धव ठाकरे यांनी लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना चिरडणं मोहन भागवतांना पटलं का? शेतकर्‍यांचे पूर्वज हिंदू नाही का असा प्रश्‍न देखील विचारला.

देवेंद्र फडवीसांवर निशाणा
आपण मुख्यमंत्री झाल्याचा मोठेपणा कधीच नसून मी तुमच्यातलाच एक असल्याचं म्हणत भाषणाला सुरूवात करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मपुन्हा येईन पुन्हा येईनफ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

केंद्राची लुडबूड नको
राज्यांच्या कारभारांमध्ये केंद्राच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दलही ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.राज्य घटनेनुसार राज्यांना कारभारात स्वायतत्ता देण्यात आलेली आहे.त्यानुसारच केंद्राने हस्तक्षेप न करता सर्व राज्यांना कारभार करण्यास मुभा दिली पाहिजे.त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version