‘या’ देशांमध्ये जायचय तर थांबा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली व भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड लस घेतलेल्या असंख्य भारतीयांना यापुढे युरोपमध्ये कदाचित प्रवास करता येणार नाही. ज्या लसींना युरोपीय समुदायाने मंजुरी दिली आहे, त्यामध्ये कोविशिल्डचे नाव नसल्यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे.

युरोपीय समुदायाने आतापर्यंत कोमिर्नाती, मॉडेर्ना, वॅक्सझेर्वरिया, जॅनस्सेन या चार कोरोना प्रतिबंधक लसींनाच मान्यता दिली आहे. कोविशिल्ड व वॅक्सझेर्वरिया या दोन्ही लसी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठानेच विकसित केल्या आहेत. मात्र भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित होणार्‍या कोविशिल्ड लसीला युरोपीय समुदायाने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र वॅक्सझेर्वरिया लसीचे उत्पादन ब्रिटनमध्येच होते. त्यामुळे युरोपमध्ये तिला अडसर आलेला नाही.

भारतात बहुतांश लोक कोविशिल्ड लस घेत आहेत. ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्या प्रवाशाला युरोपमध्ये प्रवेश दिला जाईल का, याबद्दल सध्या तरी संदिग्धताच आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे लसींच्या वाटपासाठी राबविण्यात येणार्‍या कोवॅक्स कार्यक्रमामध्ये कोविशिल्डचा समावेश आहे. अशा मान्यताप्राप्त लसीबाबत युरोपीय समुदाय अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version