प्रत्येक रुग्ण मुुंबईलाच पाठवायचे असेल तर सिव्हीलमध्ये फक्त रिसेप्श्‍न ठेवा! शेकाप नेते पंडित पाटील यांचा संताप

दहशतीखाली डॉक्टरांना पोलिस सरंक्षण देण्याची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या प्रत्येक सिरीयस रुग्णाला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक रुग्णाला जर उपचारासाठी मुंबईतच पाठवायचे असेल तर जिल्हा रुग्णालयात फक्त रिसेप्शन ठेवा अशी उपरोधीक मागणी त्यांनी केली आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना शासनाने पोलिस संरक्षण पुरविण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभाराविरोधात त्यांनी कृषीवलजवळ संपर्क साधत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विष प्राशन किंवा इतर अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात गेले असता प्रत्येक रुग्णाला तेथील डॉक्टर रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्याऐवजी मुंबईला हलविण्यास सांगत असतात. असाच प्रकार करायचा असेल तर मग हे जिल्हा रुग्णालय कशासाठी आहे? प्रत्येक वेळी असेच करायचे असेल तर जिल्हा रुग्णालयाऐवजी येथे फक्त रिसेप्शन ठेवा, आणि आलेला रुग्ण थेट मुंबईला पाठवा, जिल्हा रुग्णालय आहे की रिसेप्शनचा हॉल असा सवालही पंडित पाटील यांनी केला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स दहशतीखाली आहेत. त्यामुळे गोर गरीब कुणीही अत्यवस्थ रुग्ण आला की त्याला उपचारासाठी मुंबईला हलविण्याचा सल्ला देत असतात. डॉक्टरांना जर भीतीच वाटत असेल तर त्यांना पोलिस संरक्षण द्यावे. मुंबईला पाठवल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रहायचे कुठे, त्याचा खर्च जिल्हा रुग्णालयामधून करणार आहात का? असा प्रश्‍नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. असेच करायचे असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालये कशासाठी काढली आहेत? जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातले गेलेले रुग्ण अत्यवस्थ असले तर तात्काळ तेथील डॉक्टर अशा रुग्णांना तात्काळ मुंबईला हलविण्यास सांगतात. तर मग जिल्हा रुग्णालयातील आयसीयु विभाग कशासाठी केला आहे. इथल्या रुग्णालयातील डॉक्टरांवर एवढा मोठा खर्च केला जातो तो कशासाठी आहे असे प्रश्‍न देखील पंडीत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्यात डॉक्टरांचा काय दोष मुंबईला देखील रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो तर मग इथल्या डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण काय? डॉक्टरांच्या सरंक्षणासाठी राज्य सरकारने योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवावा अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version