अनधिकृत माती उत्खननाकडे ‌‘महसूल’चे दुर्लक्ष

रवींद्रनाथ ओव्हाळ यांचे बेमुदत उपोषण

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या माती उत्खनन होत आहे. नाममात्र स्वामीत्वधन (रॉयल्टी) काढून हजारो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याबाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे यावर नियंत्रण येण्यासाठी व संबधित महसूल अधिकारी व कर्मचारी आणि उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी सोमवार (दि. 11) पासून सुधागड प्रेस क्लबच्या वतीने सुधागड तालुका प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी पाली तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी रोहा यांना देण्यात आले होते.

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा सजातील हरणेरी येथील अमित पांडे या विकासकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून हजारो रुपयांचा महसूल बुडविला आहे. तसेच ढोकशेत येथील कारभारी जाधव या विकासकानेदेखील मोठ्या प्रमाणात माती आणि डबर उत्खनन केले आहे. त्याचबरोबर महागाव सजातील दुधनी गावच्या हद्दीतदेखील मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले असून, तेथील माती पनवेल, अलिबाग व अन्य ठिकाणी नेण्यात आली आहे. सदर माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले असता त्या चलनावर किती ब्रास माती उत्खनन करणार आहे याची नोंद नसून, केवळ रक्कमच दाखवली जाते. यातून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला दिला जात आहे.

त्याचप्रमाणे सिद्धेश्वर सजामध्ये व चीवे सजातील खुरवले हद्दीतदेखील सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे. ही बाब संबंधित महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास आणूनदेखील अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, अजूनपर्यंत कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांना रिपाइं तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे व पदाधिकारी व नागरिकांनी भेट देऊन समर्थन दर्शविले. यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version