माहिती देण्यास टाळाटाळ; डेंग्यू रुग्णांत मोठी वाढ
। नवी मुंबई । वार्ताहर ।
शहरात सध्या डेंग्यू, मलेरिया संशयित रुग्णांत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत तापाच्या रुग्णांची गर्दी होत आहे. यात काहींच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र महापालिकेकडे या रुग्णांची दैनंदिन तर सोडाच महिनाभराची नोंदही नसल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती मागितली असता एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
महापालिका डेंग्यू, मलेरिया इतर साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवीत असल्याचा दावा करीत आहेत. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू, मलेरिया रुग्णांत वाढ झाल्याचे समोर येत आहे. सध्या हवामान बदलाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उष्ण-दमट हवामान, पावसाळा यामुळे हवा दूषित होत श्वसनाचे विकारही जडत आहेत. त्याच बरोबर डेंग्यू, मलेरिया आजारदेखील बळावत आहेत. महापालिका या आजारांना अटकाव आणण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. रुग्ण संशोधक कारवाई, 100 घराअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण, डास उत्पत्ती शोध मोहीम, फवारणी, धुरीकरण इत्यादी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात या साथीचे किती रुग्ण किंवा संशयित आढळले याची माहिती मात्र ते देत नाहीत. ऑगस्टमध्ये डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली होती. 2020 जुलै अखेरीस 9 रुग्ण मलेरियाचे आढळून आले होते. तर डेंग्यूसदृश 16 जण आढळले होते. यावर्षी जुलै अखेरीस 10 रुग्ण मलेरियाचे तर डेंग्यूसदृश्य 36 जण आढळले आहेत. मात्र महापालिकेने डेंग्यू बाधित रुग्णांची माहितीच दिली नाही.
महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी जनसंपर्क विभागात माहिती मिळेल असे सांगितले. जनसंपर्क विभागाने आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आरोग्य विभाग माहिती देऊ शकतो असे सांगितले. यावर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांना आरोग्य विभागाची बैठक घेऊन माहिती देण्याची सूचना करावी लागली. यावरून साथीच्या आजाराबाबत पालिका प्रशासन किती गंभीर आहे, हे दिसून येते.