कंधारे यांचा आंदोलनाचा इशारा
। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड नगरपरिषदेला विविध विकासकामानसाठी करोडो रुपयाचा निधी आला आहे. परंतु प्रत्येक काम मजबूत व चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी मुरुड नगरपारिषदेतील कर्मचारी कोणतीही दक्षता घेत नसून कार्यालयातच बसून राहून ठेकेदाराला मोठी मुभा मिळवून देत आहेत. निकृष्ठ दर्जाची कामे झाल्याने सदरची विकास कामे अनेक वर्ष टिकणार नाहीत याला जबाबदार अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असेल तर भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. यासाठी आम्हाला जनांदोलन करावे लागले तरी आम्ही मागे पुढे पहाणार नाही असा इशारा भाजप नेते आण्णा कंधारे यांनी दिला आहे.
नगरपरिषदेकडून सध्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जी गटारे आहेत त्या गटारांना काँक्रिटचे कव्हरिंग करण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना संबंधित ठेकेदाराने समुद्रातील वाळू वापरून हे काम पूर्ण करीत आहे. याबाबत सदरच्या कामाबाबत कंधारे यांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत त्यांनी सांगितले कि, सबनीस आळी भागात गटारांची कामे सुरु असताना भाजप मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी व बाळा भगत याना हि बाब निदर्शनास आणून दिली याबाबतचे सर्व फोटो सुद्धा असून सदरची बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यावर सध्या हे काम बंद ठेवण्यात आले आहे.