‌‘प्रेस’च्या नावाखाली गैरधंदे

वाहतूक शाखेची कारवाई सुरू; बोगस पत्रकारांचा उरणमध्ये सुळसुळाट

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील काही वाहनचालक शासनाची कोणतीही मान्यता नसताना आपल्या वाहनावर ‌‘पोलीस’, ‌‘प्रेस’, ‌‘अ‍ॅडव्होकेट’, ‌‘महाराष्ट्र शासन’ अशा नावांचे लोगो आणि स्टीकर लावत असल्याचे आढळून आले आहे. या गैरप्रकाराविरोधात रायगड जिल्हा वाहतूक शाखेने मोहीम सुरू केली असून, आतापर्यंत 66 वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाची मान्यता नसतानाही अशा प्रकारचे लोगो लावणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. तरी देखील जिल्ह्यात दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांवर अशाप्रकारचे स्टीकर व लोगो लावून काहीजण मी खास आहे, असा भाव दाखवीत फिरत आहेत. काही ठिकाणी तर ‌‘प्रेस’ स्टिकरच्या आडून नशील्या पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे पत्रकारितेच्या सन्मानावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, उरणमध्ये अशा लोगोवाल्यांवर कधी कारवाई होणार, याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उरणमध्ये ‌‘प्रेस’ स्टीकरचा व्यवसायच फोफावला असून, काहींनी तर या स्टिकरची उघडपणे विक्री करून नवा धंदाच सुरू केला आहे. यामध्ये कधीही प्रसिद्ध न होणारी ऑनलाईन माध्यमे, युट्युब चॅनल्स आणि बोगस वृत्तपत्रे यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे समोर आले आहे. अशा माध्यमांशी संबंधित बनावट पत्रकारांचा उरणमध्ये सुळसुळाट झाला आहे. मी पत्रकार आहे असे सांगत वसुली, दबाव आणि राजकीय कार्यक्रमांतील मोठेपणा मिरवण्यात ते बिनधास्तपणे गुंतले आहेत. त्यामुळे या सर्व बोगस पत्रकारांची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी उरणकरांमधून होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापूर्वीच उरण पोलीस ठाण्यात निवेदन देऊन, अशा बोगस पत्रकार आणि ‌‘प्रेस’च्या नावाखाली गैरधंदे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अजूनही ठोस हालचाल न झाल्याने स्थानिक नागरिक व पत्रकार वतुर्ळात संतापाची लाट आहे. खऱ्‍या पत्रकारांचा सन्मान राखायचा असेल, तर ‌‘प्रेस’च्या नावाखाली धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई अपरिहार्य आहे, असा इशारा उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिला आहे.

Exit mobile version