शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर आमदाराचा लोगो; नागरिकांकडून कारवाईची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या अध्यक्षांचा एक ‘कार’नामा चर्चेचा विषय बनला आहे. आमदार नसतानाही त्यांनी आपल्या गाडीवर ‘आमदार’ असा लोगो लावला असल्याचे समोर आले आहे. राजा केणी असे या जिल्हाध्यक्षांचे नाव असून, त्यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजा केणी यांची डिफेंडर गाडी अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात आमदारांचा लोगो लावून राजरोसपणे फिरत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार गाडीवर लोगो लावणे चुकीचे असताना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या गाडीवर आमदारांचा लोगो असल्याचे दिसून आले आहे. लोगो लावण्यास परवानगी नसताना ते बेकायदेशीररित्या या लोगोचा वापर करीत मिरवत आहेत. त्यामुळे आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी अवस्था झाल्याची चर्चा आहे.
राजा केणी राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु असताना, आता राजा केणी यांच्या गाडीवरील लोगोबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत. त्यांच्या पदाचा आधार घेत राजा केणी आपल्या गाडीवर आमदार लोगो लावून मिरवत आहेत. आमदार म्हणून त्यांचा दुरपर्यंत संबंध नसताना त्यांच्या गाडीवर आमदार लोगो लावण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार आमदारांचे लोगो लावणे बेकायदेशीर आहे. तरीदेखील राजा केणींनी नियमांचे उल्लंघन करीत गाडीवर आमदारांचा लोगो लावला.
रायगड वाहतूक पोलिसांनी या लोगोबाबत कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले आहे. विनाकारण आमदारांचे लोगो लावणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु झालेल्या या कारवाईतून अनेकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मोहिमेत केणींवर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नियम काय सांगतात?
महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर मआमदारफ असा लोगो लावण्याचा अधिकार आहे. हा अधिकार फक्त अधिकृत आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनाच असतो. मात्र, राजा केणी हे आमदार नसतानाही त्यांनी हा लोगो वापरला, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. केणी यांनी स्वतःच गाडीवर हा लोगो लावून आपण आमदार झाल्यासारखे वागत आहेत, अशी टिप्पणी आता जिल्ह्यात सुरू आहे. या प्रकरणामुळे शिंदे गट आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
विधानसभा सदस्य अर्थात आमदार असलेल्या व्यक्तीला आपल्या वाहनावर त्यांच्या पदाचा उल्लेख असलेले स्टिकर लावण्याची मुभा आहे. मात्र, असे स्टिकर केवळ विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतांनाच लावता येतो. तसेच असे स्टिकर लावण्यात आलेल्या वाहनाची संबंधित आमदाराच्या नावाने 'आरटीओ' दफ्तरी नोंद असणेही आवश्यक आहे. तसे नसल्यास तो कायदेभंग ठरू शकतो. मात्र, स्वतःला आमदार समजणाऱ्या केणींची संपूर्ण जिल्ह्यात डिफेंडर या आलिशान कारमधून भ्रमंती सुरू आहे. संबंधीत कारच्या पुढील काचेवर आमदार असा हिरव्या रंगातील स्टिकर लावण्यात आला आहे.
जिल्ह्यात बेकायदेशीरित्या गाडीवर लोगो लावणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही कारवाई सुुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण कोणताही लोगो लावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
–भुजबळ
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा







