पनवेलमधील बेकायदा बॅनरबाजीला चाप

महापालिकेतर्फे होणार गुन्हे दाखल
| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरात वाढत्या बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली असून,जे बॅनरबाजी करतात अशांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्ता गणेश देशमुख यांनी दिलेले आहेत.

पनवेलमध्ये विविध कारणांवरुन बॅनरबाजी करणार्‍यांची मुळीच कमतरता नाही. सण -उत्सव असो वा विविध समारंभ सर्रास जाहिरात नियमावली पायदळी तुडवली जात असल्याचे निदर्शनाल आलेले आहे. अनधिकृत पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते. किंबहुना, वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असते. याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार परवानगीशिवाय बॅनर्स, होर्डिंग्ज,लावणार्‍यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र तरीही खुलेआम बॅनरबाजी होत असल्याने नवीन पनवेल सिग्नलच्या उड्डाणपुलाला लावलेल्या लोखंडी होर्डिंग्ज पालिकेच्या पथकाने काढून घेत अज्ञात इसमांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.


सध्या महापालिकेच्यावतीने शहरात सुशोभिकरणांतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. याद्वारे संपूर्ण शहर सुशोभित होत असताना अशातांकडून बॅनरबाजी करून तसेच भित्तीपत्रके लावून शहर विद्रुप करण्यात येत आहे. अशा व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन संबंधित व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणार

– डॉ. गणेश देशमुख,मनपा आयुक्त

आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ड विभागाचे अधिकारी अमर पाटील यांच्यासह कर्मचारी यांना नवीन पनवेल येथील नानासाहेब धार्माधिकारी उड्डाणपुलाला अनधिकृतपणे लोखंडी होर्डिंग्ज लावली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर होर्डिंग काढून ताब्यात घेतले आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत अंतर्गत अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version