चिल्हार नदीमध्ये अवैध बोटिंग

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील आंबिवली गावाच्या हद्दीत लेण्या असून त्या लेण्याचे रक्षण पुरातत्व विभागाचे कर्मचारी करीत असतात. मात्र त्याच पुरातन लेणी परिसरात व्हॅली क्रोसिंगचे थरार खासगी व्हॅली क्रॉसिंग व्यवसायिक यांच्याकडून आयोजित केले जातात. सर्व नियम बाजूला ठेवून व्हॅली क्रोसिंगचा व्यवसाय सुरु असून त्याच भागातून वाहणाऱ्या चिल्हार नदीमध्ये अवैध बोटिंग सुरु आहे. तेथे बोटिंगमधून कोणाला अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला असून अशा बेकायदा आणि बंदी असलेले व्यवसाय करणाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष देणार कि नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील पाण्याच्या दृष्टीने टंचाईग्रस्त म्हणून ओळखली जाणाऱ्या परिसरातील चिल्हार नदीच्या पात्राने सध्या तळ गाठला असून तेथे बोटिंग व्यवसाय करून नदीच्या पात्रात असलेले पाणी दूषित करण्याचे काम बोटिंग व्यवसायिक करीत आहेत. तालुक्यातील कोणत्याही नदीमध्ये बोटिंग करण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली नाही तरी देखील पर्यटनाच्या नावाखाली पैसे कमविण्यासाठी बोटिंग व्यावसायिक पाण्यात बोटी फिरवून त्या पाण्याची खराब करीत असल्याचा आक्षेप स्थानिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नदीत सुरु असलेले बोटिंग व्यवसाय बंद करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Exit mobile version