| रोहा | वार्ताहर |
रोहा शहर व तालुक्यात मटका, जुगार, ऑनलाईन जुगार, रमी, चक्रीजुगार चालू असून हे अवैध धंदे बंद करावेत यासाठी रोहा शहरातील भाटे वाचनालय सभागृहात विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे प्रेस क्लब या संस्थेने आयोजन केले होते. या ठिकाणी झालेल्या चर्चेत युवक बेरोजगारीमुळे अवैध धंद्यात आहेत. रोजगार मिळाल्यास अवैध धंदे बंद होतील असा सूर होता. यामुळे अवैध धंदे रोजगाराचे साधन बनले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहा शहर व तालुक्याचा पंचतारांकित विकास करण्यात आला आहे. धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही. नोकरी मिळाली तरी कंत्राटी स्वरूपाची असते या विरोधात देखील वर्षभरापूर्वी मोर्चा काढण्यात आला होता. पण परिस्थिती जैसे थेच असल्याचे या निमित्ताने दिसून आले. तालुक्यातील युवकांना रोजगार नाही अशी बोंबाबोंब सुरू असताना आवश्यक कुशल व मेहनती कामगारांची कमतरता असल्याचे विविध व्यावसायिक गटाचे सांगणे आहे. ज्यांच्या कडे पैसा आहे ते मटका, क्लब, ऑनलाईन जुगार खेळत असल्याने त्यांचे कुटुंबीय हवालदिल आहेत. जुगारी जुगार खेळत आहेत, दारुडे दारू पीत आहेत. बेरोजगार पैसे मिळविण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत आहेत असे चित्र असल्याने पंचतारांकित विकासाचे स्वप्न रोहेकर नागरिकांना दाखविणारे मात्र कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने सामान्य जनता मात्र सखेद आश्चर्य व्यक्त करत आहे.
तालुक्यातील एका पत्रकाराच्या नातेवाईकाने ऑनलाईन जुगारात लाखो रुपये हरल्यानंतर काहींना जाग आली आहे. अशी देखील चर्चा या ठिकाणी काहीजण उघडपणे करत होते. मोबाईल, संगणक, टिव्ही चॅनेल वर सातत्याने जुगार खेळा यासाठी देशभरातील काही भारतरत्न तसेच पद्म पुरस्कार सन्मानित सेलेब्रिटी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन करत असल्याने समाजातील आबालवृद्ध, तरुण, स्त्रिया जुगाराच्या खेळात अडकले आहेत. शहरातील जुगार धंदे बंद करायचे असल्यास प्रथम या क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाला रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्या. संपूर्ण राज्यातील अवैध धंदे प्रथम बंद करण्यासाठी प्रयत्न करा अशा प्रकारे या बैठकीच्या आयोजकांना काहींनी भाषणातून सांगितले यामुळे जुगार, मटका, ऑनलाईन लॉटरी, चक्री हे पुरोगामी महाराष्ट्रात रोजगाराचे नवे साधन बनत असल्याचे दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्रात कुशल, अकुशल रोजगार आहे पण त्यासाठी योग्य कामगार उपलब्ध होत नसल्याने बाहेरील नागरिकांना कामावर ठेवावे लागते. तालुक्यातील हजारो एकर लागवडीसाठी योग्य असणारी शेती कोणीही कसण्यास तयार नसल्याने ओसाड आहे. यामुळे रोहा शहर व तालुका प्रगती पथावर जाणार का अधोगतीला लागणार याची थोडक्यात चुणूक या बैठकीच्या वेळी दिसून आली.
रोह्यातील अवैध धंदे रोजगाराचे साधन ?
