। माथेरान । वार्ताहर ।
पर्यटनस्थळ माथेरानमध्ये मागील काही वर्षांपासून अवैध धंदे तेजीत दिसत आहेत. याबाबत कुणाच्याही तक्रारी येत नसल्याने मटका आणि ऑनलाइन रेसेस खेळण्यासाठी युवावर्गाची झुंबड पडत आहे. यामध्ये नियमितपणे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे हे जुगार खेळण्यासाठी अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. तर, काही जणांनी गावातील काही सावकारांकडून दहा टक्के व्याजाने पैसे काढून या जुगारात लावले होते. हा कर्जाचा अवाढव्य डोंगर फेडता येत नसल्यामुळे काहीजण गाव सोडून सुद्धा गेले होते. शेवटी त्यांना मित्र मंडळींनी आधार देऊन माघारी आणल्याचे बोलले जात आहे. गावाच्या वस्तीच्या ठिकाणी हे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. काही महिलांनी याबाबत माहिती दिली आहे. याकामी अनेकदा पोलीस कर्मचारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. पण हे अवैध धंदे आजही सर्रासपणे सुरू आहेत.