मंत्र्यांच्याच रोह्यात अवैध धंद्यांना ऊत

ना. तटकरेंनी लक्ष द्यावे, महिलावर्गाची मागणी

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा शहर व परिसरात मटका, तीनपत्ती जुगार, ऑनलाईन चक्री जुगार याचे धंदे गेल्या वर्षभरापासून खुलेआमपणे सुरु आहेत. यासोबतच गावठी दारू, गांजा व अन्य अमली पदार्थांची बिनदिक्कत विक्री नाक्या-नाक्यावर होत आहे. यामध्ये पुरुष मंडळी विशेषतः युवा पिढी आहारी जात व्यसनाधीन होत आहे. तरी, वर्षभरानंतर आ. आदिती तटकरे पुन्हा एकदा मंत्रीपदावर विराजमान होत त्यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते आले आहे. त्यामुळे वर्षभरात खुलेआम सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याकरिता त्यांनी जातीने लक्ष घालत ते तात्काळ बंद करावेत, अशी मागणी रोह्यामधील महिलावर्गाकडून होत आहे.

कुटंबाचा आधार असणारा कर्ता पुरुष व घरातील तरुण मुले या जुगार, मटक्याच्या नादात आपली रोजची कमाई घालवून कर्जबाजारी होत आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्याचे वाटोळे करत कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. महिला वर्ग यामुळे पूर्णतः त्रस्त झाला असून, कधी हे अवैध धंदे बंद होतात याकडे आशेने पाहात आहेत. आ. आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते आले आहे. त्यामुळे वर्षभरात खुलेआम सुरु असलेले सर्व अवैध बंद करण्याकरिता त्यांनी जातीने लक्ष घालत ते तात्काळ बंद करावेत, अशी मागणी येथील महिला वर्गाकडून होत आहे. त्याचप्रमाणे नव्याने रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सोनाली कदम याही महिला असल्यामुळे नक्कीच आता शहरातील सर्व अनधिकृत व अवैध धंदे बंद होतील, असा विश्वास महिला वर्गातून व्यक्त होत आहे.

रोहा अष्टमी शहर हे स्वाध्याय प्रणेते प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले, महाराष्ट्राचे कंठमणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. चिंतामणराव देशमुख यांचा वारसा जपणारे गाव म्हणून देशभर ओळखले जाते. यासोबतच विद्यमान खा. सुनिल तटकरे यांचे आजच्या राज्यातील राजकारणातील असलेल्या महत्वपूर्ण स्थानामुळे रोहा या नावास वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. असे असताना हेच शहर आज मटका, जुगार याचे महत्वाचे केंद्र बनत सर्वच अवैध व अनधिकृत धंद्यांचे आगार दिवसेंदिवस होत आहे. हे शहरास नक्कीच भूषणावह नाही.

आज शहरातील असा एक चौक व नाका नाही ज्या ठिकाणी मटका खेळला जात नाही. पान टपरी व अवैध झोपड्या उभारून त्या ठिकाणी खुलेआम मटक्याचे आकडे स्वीकारले जात आहेत. धाटाव औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर काम करणारे व शहर मोलमजुरी करणारे आपल्या कष्टाची कमाई या ठिकाणी लावत कंगाल होत आहेत. यासोबतच आजच्या ऑनलाईन जमान्यात माहीर असलेली युवा पिढी चक्री जुगारच्या आहारी जात आहे. वर्दळीच्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गाळ्यांमध्ये दिवसभर शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह युवा पिढी ऑनलाईन जुगार खेळताना पहावयास मिळत आहे. यासोबतच आज शहरात गांजा, चरस व अन्य तत्सम नशेचे पदार्थ यांची विनासायास विक्री होत आहे. त्यामुळे नशेबाजांचे प्रमाण वाढत असून, रात्रीच्या वेळी महिलावर्गाला घराबाहेर पडणे धोकादायक वाटत आहे.

आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे मागील वर्षी याच अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्वच ठिकाणच्या अवैध व अनधिकृत धंद्यांचा प्रश्न ऐरणीवर आणत त्यावर राज्यसरकारला कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्याप्रमाणे आता सुरु असलेल्या अधिवेशनात ना. अदिती तटकरे यांनी रोह्यामधील सर्व अनधिकृत धंदे बंद करण्यासंबंधी कारवाईचे आदेश पोलीस प्रशासनास द्यावेत, अशी मागणी महिलावर्गाकडून होत आहे.

Exit mobile version