स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वसुली भाईंचे फावले
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ उपलब्ध नसताना देखील पार्किंगच्या नावावर शुल्क वसुली करण्याचे काम सुरु आहे. वाहन चालकांची एका प्रकारे लूट केली जात असतानाही पोलीस अथवा संबंधीत प्रशासनांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील वसुली भाईंचे फावले आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत मोडणाऱ्या खांदेश्वरसह खारघर, मानसरोवर, तसेच पनवेल या हार्बर मार्गांवरील रेल्वे स्थानक परिसरात सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिडकोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मानसरोवर तसेच खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला उपलब्ध असलेल्या वाहनतळावर वाहनं उभी करण्यासाठी कंत्राटदार कंपनी नेमण्यात आली आहे. मात्र, स्थानकांच्या पश्चिम दिशेला सिडकोकडून कोणत्याही प्रकारचे वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने या ठिकाणी प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची शुल्क वसुली कंपनी नेमण्यात आली नसल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. असे असतानाही खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला एस.के. पार्किंग या कंपनीच्या नावावर वाहन चालकांकडून शुल्क वसुली केली जात आहे. या प्रकारावर प्रशासन कारवाई करेल का, असा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.
पावत्यांवर सिडकोचा उल्लेख नाही
रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला वाहन उभी करण्यासाठी शुल्क वसुली करताना दिल्या जात असलेल्या पावत्यांवर सिडको अथवा इतर प्रशासनाचा कोणताही उल्लेख करण्यात येत नाही. त्याचवेळी सिडकोकडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदार कंपनीच्या पावतीवर वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या कंपनीच्या नावासोबत सिडको तसेच आकरण्यात येत असलेल्या शुल्काची रक्कम अधिकृत रित्या छापण्यात येत आहे.
दररोज हजारो रुपयांची वसुली
रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध वाहन तळावर दुचाकी उभी करण्यासाठी 12 तासांकरिता 15 रु., असे शुल्क आकरण्यात येते. पश्चिम दिशेला अवैध्यपणे सुरु असलेल्या वाहनतळावर याच दराने शुल्क वसुली केली जात आहे. या ठिकाणी दररोज शेकडो वाहनं उभी केली जात असून हजारो रुपयांची वसूली केली जात आहे. त्यामुळे वसुल करण्यात येत असलेले शुल्क जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.