। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील न्यू इंडिया बँकेत 122 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि धर्मेश जयंतीलाल पौन यांना अटक केली. न्यायालयाने या दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, न्यू इंडिया बँक लुटण्यामध्ये सर्व भाजपाचे नेते आहेत. भाजपाच्या लोकांनी ही बँक ताब्यात घेऊन आपापल्या जवळच्यांना चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले. जनतेचा पैसा बिल्डर, मेहता, जैन आणि कदम यांनी लुटला आहे. आता फडणवीस, सोमय्या कुठे आहेत? तसेच, भाजपाच्या आशीर्वादाने ही लूट झाली आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नाही का, ते कुठले गृहमंत्रिपद सांभाळत आहेत.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपाच्या आमदाराच्या दबावाखाली कर्जवाटप झाले आहे, असा आरोप करून विरोधी पक्षांना आणि सत्ताधार्यांना वेगळा न्याय हा कुठला समान नागरी कायदा आणताय. मुलुंडचा पोपटलाल कुठल्या बिळात लपला आहे, कुठे गेला आहे? तसेच, या बँकेत टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे. आता ईडीकडे दाद मागायला का जात नाहीत. त्यांच्या तोंडाला बुच का बसला, असा प्रश्नही राऊतांनी यावेळी केला आहे.