गांजा प्रकरणानंतरही प्रशासन ‘झोपेत’?
| पेण | प्रतिनिधी |
दैनिक कृषीवलने यापूर्वीच पेणमधील अवैध टपऱ्यांमधून बेकायदेशीर धंदे वाढण्याचा इशारा दिला होता आणि आता तो अक्षरशः खरा ठरल्याचे समोर आले आहे. पेण शहरात एका टपरीतून तब्बल एक किलो गांजा जप्त झाल्यानंतरही प्रशासन ठोस कारवाई करण्याऐवजी ‘दाखवायची’ भूमिका घेत असल्याचा संताप नागरिकांमध्ये उसळला आहे.
पेण पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेच्या टपरीतून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाला. या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनाने संबंधित टपरी पाडून कारवाई केल्याचे दाखवले. मात्र, यावरच समाधान मानणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधण्यासारखे असल्याची टीका होत आहे. शहरात सुमारे 250 ते 300 अवैध टपऱ्या उभ्या असल्याची चर्चा असताना केवळ एकाच टपरीवर कारवाई करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांच्या मते, या टपऱ्यांमध्ये केवळ किरकोळ व्यवसाय न होता काही ठिकाणी गांजा, एमडी, मटका यांसारखे गंभीर अवैध धंदे सुरू आहेत. याशिवाय अशुद्ध खाद्यपदार्थ आणि बेकायदेशीर विक्रीही सुरू असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. अशा गंभीर प्रकारांकडे नगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का? किंवा यामागे काही आर्थिक साखळी कार्यरत आहे का? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
एक टपरी पाडून प्रश्न सुटेल?
एक टपरी पाडली म्हणजे सर्व प्रश्न मिटले का? उरलेल्या शेकडो टपऱ्यांमध्ये काय सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही ठिकाणी या टपऱ्यांना अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचाही आरोप जोर धरत आहे.
पेण शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच प्रशासनाने व्यापक आणि कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा अवैध टपऱ्यांच्या आडून सुरू असलेले हे धंदे आणखी बळावतील आणि शहराची प्रतिमा डागाळेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
