। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारतींचे प्रकरण ताजे असतानाच पनवेल पालिका हद्दीतील आडवली परिसरात पुन्हा चाळी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 2018 साली पनवेल पालिकेच्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आलेल्या या चाळींवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात पालिका प्रशासनाला मोठ्या डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे.
पालिका हद्दीत सामाविष्ठ प्रभाग ‘अ’ मधील आडीवली परीसरात असलेल्या डोंगराळ भागात बेकायदेशीरपणे चाळी बांधण्यात आल्या होत्या. पालिकेने तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 2018 साली केलेल्या कारवाईत या चाळी उद्ध्वस्त केल्या होत्या. पालिकेच्या या कारवाईचा धसका चाळ माफियांनी घेतला होता. आता मात्र बंद असलेली कामे पुन्हा सुरु करण्यात आल्याने पालिका हद्दीत चाळमाफीया पुन्हा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. डोंगराळ भाग असलेल्या या परीसरात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या या चाळींतील घरे भुमाफीयांनी पाच ते सहा लाखांना विकली आहेत. यामुळे अल्पावधितच या भागात पाचशेच्या वर अनाधिकृत चाळींचे साम्राज्य ऊभे राहीले आहे. काही स्थानीक गुंडांच्या मदतीने परप्रांतीय बिल्डर येथील जागा विकत असल्याची माहीती येथे घर खरेदी करणार्यांकडून देण्यात आली आहे.
दोन दिवसांत खोल्या तयार
आदिवासी, खासगी व अन्य जागांवर बैठ्या चाळी बांधल्या जात आहेत. कोणतेही मजबूत पाया बांधकाम नसताना एका रात्रीत फक्त विटासिमेंटच्या खोल्या बांधल्या जात आहेत. थोडा धक्का लागला तरी हे बांधकाम कोसळेल असे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केले जात आहे. तरीदेखील या बैठ्या चाळीत खोल्या बांधून लगेच त्यात लोकांना विकत किंवा भाड्याने रहायला दिल्या जात आहेत. आतापर्यंत तीन ते पाच लाखांपर्यंतच्या रकमेत खोल्या विकल्या गेल्या आहेत. मुंबई-ठाण्यातील किंवा बाहेरचे लोक या खोल्या खरेदी करत आहेत.
उपायुक्तांना याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. याबाबत तपास करून नियमानुसार यावर कार्यवाही करण्यात येईल.
– मंगेश चितळे, आयुक्त,
पनवेल महानगर पालिका
बेकायदेशीर चाळी उभारून त्यातील घरांची विक्री करताना सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. अशा फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. जेणेकरून फसवणूक होणार नाही.
– हरेश केणी, माजी नगरसेवक