सुधागड तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड

| सुधागड -पाली | वार्ताहर |

हिरवेगार, शांत ठिकाण म्हणून सुधागड तालुक्याची ओळख आहे. मात्र सुधागड तालुक्यामध्ये काही विकासकानी वनराई नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी शेतघरांच्या नावाखाली मोठमोठे बंगले बांधण्या येते. जागा स्वच्छ करण्याच्या नावाखाली झाडांची तोड केली जाते. त्यातून पर्यावरणाचा -हास होत आहे. मात्र याकडे वनविभाग कानाडोळा करीत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत झाडे तोडून रस्त्यांसाठी वाटा मोकळ्या केल्या जात आहेत. अशा विकासकांना वनराई नष्ट करण्याची मुभा दिली आहे का? असा सवाल पर्यावरणप्रेमी करीत आहेत. तालुक्यात डोंगर खो-यांमध्ये शेतीघरांच्या नावाखाली बंगले बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनविभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर झाडी नष्ट केली जात आहे. वारंवार वनखात्याला याबाबत अनेकदा नागरिकांकडून सूचित करण्यात येते पण वनविभागाकडून छोट्या छोट्या कारवाई करून या विकासकांना जंगलतोड करण्यासाठी मुभा दिली आहे की काय? असा प्रश्‍न स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यात पर्यावरणाला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. एकंदरीत वनखात्याच्या या कारभारामुळे येथील वनसंपदा लोप पावत चालली आहे. वनविभाग विना परवानगी बेकायदेशीर वृक्ष तोड करणा-यावर कारवाई करणार का ? याकडे संपूर्ण सुधागड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version