प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो हेक्टर वनक्षेत्र धोक्यात
| उरण | प्रतिनिधी |
अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या उरण तालुक्यात खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी (कांदळवन) नष्ट करून त्याठिकाणी दगड व मातीचा बेकायदा भराव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, धुतूम, पागोटे, सोनारी ग्रामपंचायत हद्द तसेच द्रोणागिरी नोड परिसरात हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महसूल, वन आणि सिडको विभागाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी मौन बाळगत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यावसायिक व यार्ड मालक खाडीकिनाऱ्यालगतची खारफुटी हटवून त्या जागेवर मातीचा भराव करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवरील काही घटकांना हाताशी धरल्याचीही चर्चा आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘अज्ञात व्यक्तींविरुद्ध’ औपचारिक कारवाईचा दिखावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात बेकायदेशीर कामे सुरूच असल्याचा आरोप आहे.
उरण तालुका औद्योगिकीकरणाच्या वेगात झपाट्याने बदलत असताना नैसर्गिक संपत्तीवर गदा येत असल्याचे चित्र आहे. खारफुटी ही किनारपट्टीची नैसर्गिक ढाल मानली जाते. चक्रीवादळ, त्सुनामी आणि भरती-ओहोटीच्या लाटांपासून मानवी वस्त्यांचे संरक्षण करणे, जमिनीची धूप रोखणे, कार्बन डायऑक्साइड शोषून पर्यावरण संतुलन राखणे आणि मासे-पक्ष्यांसाठी प्रजनन केंद्र म्हणून कार्य करणे, अशा अनेक पर्यावरणीय भूमिका ती बजावते. अशा उपयुक्त वनक्षेत्रावरच अतिक्रमण होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ‘हे काम माझ्या कार्यक्षेत्रातील नाही,’ असे त्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली. मात्र महसूल, वन, खारलँड आणि सिडको विभागांनी समन्वयाने तात्काळ कारवाई करून बेकायदा भराव थांबवावा, अन्यथा उरणमधील खारफुटीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
