पारंपरिक मच्छिमार हवालदिल
| उरण | वार्ताहर |
उरण-करंजा बंदरासमोरील समुद्रात उरणपासून श्रीवर्धनपर्यंत एलईडी, पर्ससीन नेट व फास्टर नौका पुन्हा राजरोस घुसखोरी करुन अवैध मासेमारी करत आहेत. दररोज या नौकांचा आठ ते दहा सागरी मैल अंतरामध्ये हा उच्छाद सुरु आहे. परंतु, त्या नौकांवर यंत्रणांकडून कारवाई होत नसल्यामुळे येथील मच्छिमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मासेमारी उद्योगामधील आर्थिक राजधानी म्हणून अलिबाग आणि उरण तालुक्यातील करंजा बंदर ओळखले जाते. याठिकाणी दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. ही उलाढाल गेल्या सात ते आठ वर्षांत खूपच कमी होऊ लागली आहे. याला समुद्रात चाललेली सर्वच प्रकारची अवैध मासेमारी कारणीभूत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. गेली दहा वर्षे येथील पारंपरिक मच्छिमार एलईडी, फास्टर आणि पर्ससीन नेट मासेमारीविरोधी लढत आहे. याला आळा घालण्यासाठी कायदे होऊनही आजपर्यंत त्याला रोख लागलेला नाही. या बंदरात साधारणपणे रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील कोळीवाडे मिळून सुामरे दोन हजार मासेमारी नौका व्यवसाय करतात. या मच्छिमारांकडे ना फास्टर, ना पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या महागड्या बोटी आहेत. पारंपरिक बोटींच्या सहाय्याने ते आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, परप्रांतीय फास्टर आणि पर्ससीन नेट नौकांकडून समुद्रात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध आणि बेकायदेशीर मासेमारी सुरु आहे. परप्रांतीय नौकांकडून सर्व प्रकारचे लहान-मोठे मासे मारले जातात. त्यामुळे बंदरातील मच्छीचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रकार असेच सुरु राहिले, तर मत्स्यदुष्काळ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया मच्छिमारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.