खाऊगल्लीमुळे आजाराला निमंत्रण

अन्न भेसळ खात्याचे दुर्लक्ष

| पेण | प्रतिनिधी |

पेणमध्ये अवैध खाऊच्या गाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगरपालिका मैदानाच्या रस्त्यावर तर एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत की, त्या रस्त्याला पोराटोरांनी खाऊ गल्ली म्हणूनच संबोधायला सुरूवात केली आहे. साधारणतः या रस्त्याला 25 ते 30 खाऊच्या गाड्या वेगवेगळे पदार्थ तयार करताना दिसतात. सकाळ-संध्याकाळ या गाड्यांवर तोबा गर्दी पहायला मिळते. गर्दी जास्तीची असल्याने अस्वच्छता दिसून येते. बर्‍याच वेळेला नजरेस दिसणारी अस्वच्छता म्हणजे प्लेट, चमचे योग्य प्रकारे न धुता वारंवार धुण्यासाठी वापरलेल्या पाण्यातच विसळून घेतले जातात, ते योग्य प्रकारे स्वच्छ केले जात नाहीत. तसेच हे पदार्थ तयार करणारे व्यक्ती एवढे अस्वच्छ असतात, की त्यामुळेदेखील कळत-नकळत संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात. एकंदरीत काय, तर खाऊगल्लीतील अस्वच्छता पाहता तिथे पदार्थ खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण करणे होय.

पेणच्या खाऊगल्लीत उभ्या असलेल्या 25 ते 30 गाडीवाल्यांकडे अन्न भेसळ खात्याचा कोणताही परवाना नाही. असे असतानादेखील अन्न भेसळ खात्याचे कर्मचारी व अधिकारी या गाड्यांविरुद्ध कारवाई करण्यास पुढे येत नाही. याचाच अर्थ, असे समजू नये का? अन्न भेसळ खात्याच्या अधिकार्‍यांचा व खाऊगल्लीतील गाडीवाल्यांचे काही टेबलाखालील संबंध नाहीत ना? आताच्या स्थितीला तेथे वापरण्यात येणारा तेल, चिज, बटर यांची क्वॉलेटी पाहिली तर ते शरीरासाठी अपायकारक आहेत. चायनीज पदार्थांमध्ये वापरण्यात येणारा अजिनोमोटो, रंग, वेगवेगळे सॉस हेदेखील कमी दर्जाचे असल्याने शरीराला अपायकारक असतात. तसेच येथे बंद बुच पाण्याच्या बॉटलदेखील विक्रीसाठी असतात. बर्‍याचशा बॉटल या आयएसआय मार्कच्या नसल्याने भेसळयुक्त पाणी देखील विक्रीसाठी ठेवले जाते. या सर्व बाबींकडे लक्ष देण्यासाठीच अन्न भेसळ खात्याची जबाबदारी असते; परंतु अधिकारी वर्ग आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत.
खाऊ गल्लीतील टपर्‍यांना संरक्षण देण्यासाठी काही नगरपालिकेचे कर्मचरी या टपरीधारकांकडून महिन्याला आर्थिक हितसंबंध जपत असल्याने परप्रांतीय टपरीवाले शिरजोर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी हे टपरीचालक फटकून बोलत आहेत. त्याचप्रमाणे कुणी विद्यार्थ्यांनी उलटून उत्तर दिल्यास नगरपालिकेचे कर्मचारी या विद्यार्थ्यांना दमही देताना दिसत आहेत. याबाबीकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा भविष्यात जनसामान्यांची आरोग्यविषयक काही वाईट घडल्यास ही जबाबदारी नगरपालिका स्वीकारेल का? याविषयी विचारणा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी मुख्याधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होउ शकला नाही.

दूषित पाण्याने अनेक आजारांना निमंत्रण
मुले संध्याकाळी घराबाहेर पडतात ती बाहेरून काही ना काही खाऊनच घरी परतात. मात्र, तेथे दूषित पाण्याचा वापर होत असल्यास विविध आजाराला निमंत्रण मिळू शकते. पाणीपुरीसारख्या खाद्व पदार्थ देणार्‍यांचे हात पाहिल्यास बर्‍याच वेळेला त्या हातांच्या सहाय्यानेदेखील आजार पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच पाणीपुरीमध्ये दूषित पाण्याचा वापर झाल्यास जुलाब, उलटी, ताप किंवा टायफॉइडही होऊ शकतो. त्यामुळे बालकांची काळजी घेणे व त्यांना बाहेरील खाद्यपदार्थ देणे टाळावे.
स्थानिकांपेक्षा परप्रांतियांच्याच गाड्या जास्त
या खाऊगल्लीत असणार्‍या गाड्यांमध्ये स्थानिक तरुणांपेक्षा परप्रांतियांच्याच गाड्या जास्त असल्याचे आढळत आहे. त्यामुळे या परप्रांतियांना स्थानिकांच्या आरोग्याशी काही घेणे देणे नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांसाठी वापरण्यात येणारे सामान हा दुय्यम क्वॉलेटीचे असते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ हे योग्य क्वॉलिटीचे नसतात.

नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर खाऊगल्ली आहे. मात्र, येथील अस्वच्छता पाहता बर्‍याच वेळेला दुर्गंधी सुटून नाकाला रुमाल लावण्याची वेळ येते. ही बाब लक्षात घेउन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व गाडी चालकांना स्वतःचे डस्टबीन वापरण्याची तंबी दिली आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सांगितले आहे. परंतु 90 टक्के गाडीवाले नगरपालिकेचे आदेश धुडकावून देत आहेत. याबाबत नगरपालिकेने योग्य ती स्वच्छता न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

दयानंद गावंड,
निरीक्षक, आरोग्य विभाग

Exit mobile version