उरणमध्ये बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्री

। उरण। वार्ताहर।
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली जे जे विभाग येतात, त्या सर्वांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उरणमध्ये सर्रासपणे त्याचे उल्लंघन होत आहे. याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सदरच्या प्रशासनाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील चायनीज गाड्यांवरील खाऊन मुलांना बाधा झाली होती. तरीही उघड्यावरील खाद्यपदार्थ कोणतीही परवानगी न घेता आजही खुलेआम सुरू आहेत. यावरून प्रशासन कोणाचा मृत्यू होण्याची वाट बघतेय का, असा प्रश्‍ना निर्माण झाला आहे.


अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली खाद्यपदार्थ, मिठाई, औषध, चिकन, मांस, बेकरीतील पदार्थ असे अनेक व्यवसायावर नियंत्रण असते. परंतु, उरणमध्ये अशा व्यावसायिकांकडून उघडपणे उल्लंघन होऊन जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. याबाबत संबंधित विभागाच्या वेगवेगळे वृत्त अनेकवेळा प्रसिद्ध होऊनही ठोस अशी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केल्याचे दिसत नाही.


काही दिवसांपूर्वी उरण शहरातील चायनीज गाडीवरील खाद्यपदार्थ खाऊन लहान मुलांना बाधा झाली होती. सुदैवाने कोणी दगावले नाही. या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनाने अथवा अन्न व औषध प्रशासनाने कोणतीच ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही. उलट, ज्या चायनीज गाडीवरील खाऊन बाधा झाली होती, तीच फक्त बंद आहे. इतर शहरातील व तालुक्यातील उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या गाड्या सुरू आहेत.


यावरून या घटनेचे गांभीर्य ना उरण नगरपालिका, ना अन्न व औषध प्रशासनाला पडले आहे. एका घटनेवरून प्रशासन बोध घेत नसेल तर कोणाचा मृत्यू झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारतील का अशी चर्चा जनतेत सुरू आहे. उरणमधील नियमांचे उल्लंघन करून जनतेच्या जीवाशी खेळणार्या व्यावसायिकांची तक्रार अन्न व औषध खात्याच्या मंत्र्याकडे करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.

Exit mobile version