वनविभागाची कारवाई; 18.69 लाखांचा मुद्देमाल जप्त
| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर अवैधरित्या सोलीव खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकाविरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध खैरतोड करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 8.19 वाजण्याच्या सुमारास, माणगाव तालुक्यातील विघवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर संशयित टाटा 1916 टेम्पो क्र. डीडी 01 एसी 9590 या टेम्पोला थांबवून तपासण्यात आला. तपासादरम्यान वाहनात खैर सोलिव लाकूड अंदाजे 11.400 घनमीटर, किंमत सुमारे 69,309 रुपये, विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित टेम्पो अंदाजे किंमत 18 लाख रुपये आणि लाकूड असा एकूण 18,69,309 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक नदीम अहमद रा. वापी, जि. वलसाड, गुजरात याच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई रोहा उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव व रोहा सहाय्यक वनसंरक्षक पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच दक्षता पथक ठाण्याचे विभागीय अधिकारी रोशन राठोड आणि वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा विकास भामरे यांच्या देखरेखीखाली, माणगाव वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या आदेशान्वये पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत इंदापूर वनपाल सुजित राजमाने, कुशेडे वनरक्षक अजिंक्य कदम तसेच वन मजूर विठ्ठल दिघे, विवेक जाधव यांनी सहभाग घेतला. गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रात्रीच्या गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास वनक्षेत्रपाल माणगाव करत असून, अवैध लाकूड तस्करी विरोधात वनविभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.







