अवैध एलईडी मासेमारी मच्छिमारांच्या मुळावर

कोकण किनारपट्टीवरील दर्याचा राजा पुन्हा संकटाच्या खाईत

| कोर्लई | वार्ताहर |

सातत्याने हवामानात होणारे चढ-उतार, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम यामुळे राज्याच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीचा दुष्काळ पडला असून, दर्याचा राजा संकटाच्या खाईत लोटला आहे. खोल समुद्रात होणारी अवैध एलईडी मासेमारी पारंपरिक मच्छिमारांच्या जीवावर कर्दनकाळ ठरते आहे. यामुळे मुरुड-जंजिरा पर्यटनात फिरायला येणार्‍या पर्यटकांच्या खवय्येगिरीवर विरजण पडले आहे.

वारंवार होणारे हवामानातील बदल याबरोबरच समुद्रातील वाढते जलप्रदूषण, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप, अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारीमुळे दिवसेंदिवस समुद्रातील माशांचे उत्पादन घटत चालले आहे. राज्याच्या 720 कि.मी. लांबीच्या समुद्रकिनारपट्टीवर असलेला दर्याचा राजा गेली कित्येक वर्षे मासळी दुष्काळाच्या कचाट्यात सापडत चालला असून, संकटाच्या खाईत लोटला आहे. तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत. तर, काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहेत. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. घोळ, जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व काही वर्षांपासून कमी झाले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छिमारांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.

समु्द्रात मिळणारी थोडीफार कोळंबी गायबच झाली असून, मोठी मासळी तर दिसेनाशी झाली आहे. याला जबाबदार अवैध एलईडी मासेमारी व पर्ससीन मासेमारी आहे. यांच्यामुळे समुद्रातील लहानसहान जीव नष्ट होत असल्याने उत्पादन घटत आहे.

रोहन निशानदार,
स्थानिक मच्छिमार
Exit mobile version