नागोठण्यात गावठी दारूचे धंदे राजरोसपणे सुरूच

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्याजवळील ऐनघर विभागामधील सुकेळी व आदिवासी वाडी परिसरातील जंगलात गावठी दारुची निर्मिती व गावठी दारुचे अवैध धंदे तेजीत सुरु आहेत. या गावठी दारूचा पुरवठा नागोठणे विभागातील मुरावाडी, वरवठणे, वेलशेत-आंबेघर, कडसुरे, पळस आदींसह सर्वच परिसरात दारुच्या पार्सल सेवेने होत असल्याने तेथेही गावठी दारुची विक्री होत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दारूबंदी खाते व स्थानिक पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागोठणे विभागात 2018 मध्ये 09, 2019 मध्ये 12, 2020 मध्ये 06, 2021 मध्ये 11, 2022 मध्ये 33 तर 2023 मध्ये 06 अशा एकूण 76 केसेस करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने या केसेस फक्त सरकारला व वरिष्ठांना दाखविण्यासाठी करण्यात आल्यात का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नागोठणे परिसरातील गावठी दारु निर्मितीच्या अड्ड्यांवर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईत केवळ नवसार मिश्रित बेवारस रसायन भरलेले ड्रम वगैरे माल नष्ट करण्यात येत आहे. मात्र सदर दारुनिर्मिती अड्डे चालविणारे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागोठणे विभागात हे अवैध गावठी दारूचे अड्डे वारंवार बंद करूनही पुन्हा ते नव्या जोमाने सुरु होत आहेत. त्यामुळे या अवैध गावठी दारु अड्डेवाले व विक्रेत्यांना नक्की कुणाचा आशीर्वाद आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

त्यामुळेच दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या अवैध गावठी दारु निर्मितीच्या अड्ड्यांवर व गावठी दारू धंद्यावर तसेच चोराटी व पार्सल पद्धतीने सुरु असलेल्या गावठी दारुच्या विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क खाते व पोलिसांनी लवकरात लवकर तसेच ठोस कारवाई करुन गावठी दारुविक्री समूळ नष्ट करावी, अशी मागणी या विभागातील महिलावर्गांकडून होत आहे.

Exit mobile version