जिल्ह्यात अवैध दारु विक्रीची ‘झिंग’

गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये वाढ प्रशासनाचे दुर्लक्ष
। अलिबाग । वर्षा मेहता ।
लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडाऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तींच्या अधीन राहून दारुविक्रीला रीतसर परवानगी दिली. मात्र, तरीही अवैध दारु विक्री तेजीत असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात 279 अवैध दारुविक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, गेल्या वर्षभराची आकडेवारी 226 इतकी होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अवैध दारुच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये दारूबंदीची 258 प्रकरणे, 2020 मध्ये 226 प्रकरणे आणि 2021 मध्ये केवळ आठ महिन्यांत 17 ऑगस्ट 2021 पर्यंत 279 गुन्हे दाखल आहेत.
कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेदरम्यान दारूबंदीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी तपासात रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली आहे. 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यांत, म्हणजे जून 2021 मध्ये दारूबंदीचे 53, जुलैमध्ये 31 आणि ऑगस्ट 13 पर्यंत 57 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
अवैध दारू प्रकरणांची वाढती संख्या चिंतेची बाब असून, दारुच्या सेवनामुळे अनेक गंभीर गुन्हे घडत असल्याचेही समोर आले आहे. ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळापासून अवैध दारू विक्री व्यवसाय नव्या जोमाने सुरू झाला असून, अवैध दारू विक्री व्यावसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेकदा पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात; परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

साल गुन्हे
2019- 258
2020- 226
2021 (17 ऑगस्ट)- 279

जून – 53
जुलै – 31
ऑगस्ट (13)- 57

Exit mobile version