आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यात अवैध दारूची टायर ट्यूबमधून होत असलेली तस्करी उघड करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ट्यूबमध्ये चलाखीने दारू भरून चारचाकी वाहनातून वाहतूक केली जात असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रणजीतसिंह खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ पथक तयार करण्यात आले. पोलीस हवालदार खराडे यांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार खालापूर तालुक्यात मौजे कुंभीवली येथे एका संशयित वाहन अडवून झडती घेण्यात आली. यावेळी टायर ट्यूबमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत ट्यूबमध्ये भरलेली 24 हजार रुपये किमतीची 240 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच 95 हजार किमतीचे टाटा कंपनीची इंडिका डीलक्स वाहन (क्र. MH 06 AB.7517)असे एकूण एक लाख 19 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, आरोपी दिनेश नारायण नरे (वय 52, रा. वरने, ता. कर्जत-रायगड) याला ताब्यात घेण्यात आले. खालापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढील अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत.
या मोहिमेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार शरद फरांदे, रणजीत सिंह खराडे, पोलीस शिपाई प्रदीप खरात या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. खालापूर तालुक्यात अवैध दारू विरोधात पोलिसांनी दिलेला हा मोठा दणका असून बेकायदेशीर धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्यांना माफी नाही, हा ठाम संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
