महाडमध्ये पोलिसांची धडक कारवाई

10.24 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त; दोघांना अटक

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहर पोलिसांनी अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 10 लाख 24 हजार रुपयांचा बेकायदेशीर मद्यसाठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 21 जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आनंदनगर येथील ए-01 बिर्याणी शॉपसमोर उभी असलेली काळ्या रंगाची अर्टिगा संशयास्पदरीत्या आढळली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक गर्जे आणि त्यांच्या पथकाने वाहनाची झडती घेतली.

झडतीदरम्यान कोणताही वैध परवाना नसताना वाहतूक करण्यात येत असलेल्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की आणि टुबर्ग प्रिमियम बिअरच्या बाटल्या व बॉक्स मोठ्या प्रमाणात आढळून आले. पोलिसांनी मद्यसाठ्यासह अर्टिगा वाहन असा एकूण 10 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आकाश विलास महाबळे (24) रा. पुनाडेवाडी, ता. महाड आणि सुरेश कोंडू गोरे (48) रा. हिरकणीवाडी, ता. महाड यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राधौत करीत आहेत. अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Exit mobile version