मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांवर कारवाई करा; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
महाराष्ट्रात मंगुर माशाचे प्रजनन व संवर्धन करण्यावर बंदी असूनही मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मंगुर माशाची शेती केली जात असल्याचे उघड झाले आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रकार 15 दिवसांपूर्वी उघड झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मला हीच कामे नाहीत, वेळ मिळेल तेव्हा संबंधित ठिकाणी भेट देतो, मला व्हिडीओ शूटिंग करून पाठवा अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देऊन या कारवाई प्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
बंदी असलेल्या मंगुर नावाच्या माशांना रात्रीच्या वेळेत कुजलेले बैल, शेळी, कोंबड्यांचे मास, आतडे यांचे छोटे छोटे तुकडे करून अन्न म्हणून दिले जात असल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊन कॅन्सरसारख्या आजाराची लागण होत असल्याने असे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र रद्द करण्याचे आदेश मत्सव्यवसाय विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र राज्य शासनाच्या या आदेशाला रायगडच्या मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
मत्स्यव्यवसाय अधिकारी व बेकायदेशीर पणे मंगुर माशाचे उत्पादन करणारे व्यापारी यांच्यात असलेल्या “अर्थपूर्ण” संबंधामुळे अनेक शेतकरी पेणमध्ये मंगुर माशाची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. पेण तालुक्यातील पूर्व विभागातील सापोली ग्राम पंचायत हद्दीतील तळवळी गावात जवळपास 4 ते 5 एकर जमिनीमध्ये मोठमोठे 13 ते 14 तलाव खोदून हजारो टन मंगुर माशांची पैदास या ठिकाणी केली जात आहे. आणि रात्रीच्या अंधारात त्याची विक्री सुद्धा केली जात आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी सुरेश भारती या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून अशा प्रकारच्या शेती करायला सहकार्य करत आहेत आणि उडवाउडवीची उत्तरे देऊन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारची आरोग्याची हानी करत असणाऱ्या व कॅन्सरसारख्या रोगाला आमंत्रण देणाऱ्या मंगुर माशांवर बंदी असून देखील जे व्यापारी हे व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल तर व्हायलाच पाहिजे. याशिवाय अशा व्यावसायिकांना हे मासे प्रजनन आणि संवर्धन विकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि साथ देत आहेत अशा अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मला हीच कामे नाहीत, तलावांची व्हिडीओ शूटिंग करून मला पाठवा, वेळ मिळेल तेव्हा संबंधित ठिकाणी भेट देतो. स्थानिक पोलिसांना घेऊन तुम्हीच कारवाई करा.
सुरेश भरती, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग