ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली; सहा वाड्यांतील ग्रामस्थ भयभीत
| म्हसळा | वार्ताहर |
दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव ते म्हसळा दिघी हा 60 किमी अंतराच्या रस्त्याचे बांधकाम विकासक ठेकेदाराकडून सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामाला लागणार्या दगड खाणीसाठी सन 2018 मध्ये ग्रामस्थांचा विरोध डावलून घोणसे सरपंचाच्या मध्यस्थीने हमरस्त्याचे काणसेवाडीलगतच मोठे डोंगर खोदून खडी दगड उत्खनन करण्यास परवानगी घेतली होती. दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. सहा वर्षे झाली तरी एकाच परवानगीवर दगड खाणीचे उत्खनन सुरूच आहे. येथे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास झाला असून, शासनाचा किती महसूल बुडाला याचा काही मोजमाप नसले तरी डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर होत असलेले अवैध उत्खनन हे महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीच्या डोळ्यादेखत छुप्या मार्गाने अर्थसहाय्याचे जोरावर मनमानी पद्धतीने आणि राजरोसपणे सुरू असल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांचे वतीने योगेश महागावकर यांनी केली आहे.
मागील सहा वर्षे घोणसे ग्रामपंचायत हद्दीतील काणसेवाडी लगत राष्ट्रीय मार्गाला लागूनच मोठ्या प्रमाणात दगड खानीचे उत्खनन सुरू आहे. माणगाव ते दिघी हा 60 किमी अंतराचा काँक्रिट रस्ता पूर्ण झाला तरी दगड खाण संपलेली नाही. इतका मोठा घबाड या खानीतून उत्खनन होत आहे. संपूर्ण डोंगर पोखरून दगड खान खोलवर खोदण्यात आली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास झाला आणि तो सातत्याने सुरू आहे. ग्रामसभेत खाणकाम बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला असूनदेखील मागल्या दाराने सरपंच यांचा हात असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. यातून मागील सात वर्षांत ग्रामपंचायतीला आणि म्हसळा महसूल विभागाला उत्खननातून किती महसूल मिळाला याचा शासनाने तपास करणे गरजेचे आहे. अनधिकृत दगड खाण उत्खनन करण्यास कोणाचे छुपे हात आहेत ते शोधून काढणे आवश्यक आहे.
अवैध उत्खनन आणि शासन महसूल बुडव्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी घोणसे गावातील ग्रामस्थांचे वतीने योगेश महागावकर यांनी करताना त्यांनी मंत्री आदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, म्हसळा महसूल विभागाला लेखी पत्र देऊन तक्रार केली आहे. महागावकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मोठ्या प्रमाणात बोर ब्लास्ट होत असल्याचा तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला आहे मात्र ब्लास्ट उत्खनन करण्यास बंदी घालण्यात आली नसल्याने याचे मागे कोणाचे छुपे हात दडले आहेत याचा संबंधीत पोलिस अधिकारी आणि महसुली वरिष्ठ अधिकार्यांनी शोध घ्यावा आणि कडक करवाई करण्याची मागणी महागावकर यांनी लेखी तक्रार अर्जात केली आहे.
उत्खनन होत असलेल्या दगड खाणीत 40 फूट खोल बोर मारून जिलेटीनच्या कांडीने ब्लास्ट करून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ब्लास्ट कधी आणि कसे झाले याची तारीख, वार, वेळेची नोंद तक्रार अर्जात नमूद केली आहे.
योगेश महागावकर,
तक्रारकर्ते
घरांना तडे, प्रशासनाचे दुर्लक्ष
खाणीत ब्लास्ट उत्खनन होत असल्याने काणसेवाडीसह देवघर आणि घोणसे गावाच्या सहा वाडीत हादरे बसून घरांच्या भिंतीना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. देवघर आणि घोणसे ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांश गावे ही डोंगर माथ्यावर वसलेली आहेत. खाणीत ब्लास्ट करून उत्खनन करण्यात येत असल्याने जमिनीला हादरे बसून येथील गावांची ऐन पावसाळ्यात मालीन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.






