। पेण । प्रतिनिधी ।
अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून दिव गावचा तरुण विजय म्हात्रे याने 17 नाव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार म्हणून वडखळ पोलीस ठाण्यात कलम 306 खाली गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपींनी जिल्हासत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून धाव घेतली होती. परंतु जिल्हासत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
तेरा दिवस उलटून आरोपी साजन पाटील, मयुर धांडे, रमेश भोईर हे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. जिल्हासत्र न्यायालयाने यातील तिन्ही आरोपींचा जामीन नाकारल्याने आरोपी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची देखील चर्चा आहे. या गुन्हयातील आरोपी अटक होत नसल्याने उलटसुलट चर्चानां खारेपाटासह पेण तालुक्यात एकच चर्चेला उधाण आलेले आहे.
दरम्यान,राजकीय हस्तक्षेप या गुन्हयात होत असून आरोपींना पकडण्यात पोलीसांवर बंधन येत आहेत. तरी पोलीसांनी राजकीय दबावाला बळी न पडता आरोपींना लवकरात लवकर अटक करावे अन्यथा येत्या दोन दिवसात पेण उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकेल. असा इशारा विजय म्हात्रेच्या मित्र परिवारातर्फे देण्यात आला आहे.