| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड रेल्वे स्टेशनसमोरील सर्व्हिस रोडवर बेशिस्त पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक, वाहनचालक आणि रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. सर्व्हिस रोडवर वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गालगत असलेले सर्व्हिस रोड हे स्थानिक वाहतुकीसाठी तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र, कोलाड रेल्वे स्टेशनसमोरील सर्व्हिस रोडवर बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्याचा वापर वाहतुकीपेक्षा वाहनांच्या पार्किंगसाठी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्यामुळे सर्व्हिस रोड नेमके पार्किंगसाठी आहेत की वाहतुकीसाठी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर अतिक्रमण किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करण्याची मुभा आहे काय?असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गावरील कोलाड रेल्वे स्टेशन समोर असणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे घाई घाईने कोलाड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन बेशिस्त पार्किंग हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी प्रवाशी नागरिकांकडून व्यक्तकरण्यात येत आहे.







