समुद्र किनाऱ्याची धूप, रस्ता गेला वाहून
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे समुद्रकिनारी बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात बंधाऱ्याची धूप झाली असून, तेथील किनारीलगत असलेला डांबरी रस्ता वाहून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार देऊनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोर्लई गावाला अंदाजे दोन कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी अर्ध्या भागात नव्याने दगडी बंधारा बांधण्यात आला. परंतु, उर्वरित भागात बंधारा नसल्याने उधाणाच्या पाण्याने बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. तेथील किनाऱ्यालगत कोर्लई ते बोर्लीकडे जाणारा डांबरी रस्तासुद्धा अर्धा वाहून गेला आहे. रहदारीचा असलेला रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यास तेथून जाणे-येणे जिकिरीचे होईल, असे ग्रामस्थांचे संबधीतानी कोर्लई समुद्र किनारी लवकरात लवकर धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कोर्लई समुद्र किनारी बेकायदेशीररित्या वाळू उत्खन्नन केले जात आहे व त्यामुळेच समुद्र किनारी मोठया प्रमाणात धुप होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले, याबाबत कोर्लई ग्रामपंचायत सरपंच राजश्री मिसाळ यांनी दुजोरा दिला असून, कोर्लई समुद्र किनारावर होत असलेल्या वाळू उत्खन्नना बाबत अनेकदा शासन दरबारी तक्रार निवेदन देण्यात आली आहेत. मात्र, संबधीताच्या दुर्लक्षतेने बेकायदेशीर वाळू उत्खन्नन थांबविले जात नाही, परिणामी कोर्लई समुद्र लगत मोठया प्रमाणात धुप होवून तेथील अर्धा डांबरी रस्ता वाहून गेला आहे. कोर्लई येथील बेकायेदशीर वाळू उत्खन्ननाबाबत मुरूड तहसिलदार यांना तक्रार निवेदन ग्रामपंचायत कोर्लईच्या वतीने देण्यात येणार आहे असे त्यांनी पुढे म्हटले.







