महामार्गावर भंगार व्यवसायाचे पेव

लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने जोरदार धंदा

। पेण । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि खड्डे हे समीकरण सर्वांनाच माहीत आहे. परंतु मुंबई-गोवा महामार्ग आणि अवैध धंदे हे समीकरण नव्याने प्रस्तापित होत आहे. आज गुटख्यापासून तंबाखूपर्यंत, दारूपासून एमडीपर्यंत अनेक अवैध धंदे महामार्गावर रात्रीच्या वेळी खुलेआम चालत असल्याची चर्चा आहे. स्थानिक पोलिसांचे या अवैध धंद्यांना अभय असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

खारपाडा गोविर्लेच्या दरम्यान राजरोसपणे अवैध भंगार धंदा सुरू असूनदेखील पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबद्दल माहिती घेतल्यावर जे सत्य समोर आले ते खूपच भयानक आणि लोकप्रतिनिधी काय करू शकतात याचा जणू काय पर्दाफाशच झाला. अवैध भंगार धंद्याला पेणच्या लोकप्रतिनिधींचा विरोध असतानादेखील तो विरोध न जुमानता इतर सत्ताधारी आमदारांनी नसिमवर मेहर नजर दाखवून भंगार धंद्याला पाठबळ दिल्याचे वास्तव समोर आले. अवैध धंद्याना जर लोकप्रतिनिधीच पाठबळ देत असतील, तर यापेक्षा वाईट ते काय?

महत्त्वाची बाब म्हणजे, पेण तालुक्यातील लोकप्रतिनिधी अवैध धंदयाना अजिबात खतपाणी घालत नाहीत हे ही तेवढेच सत्य आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. परंतु बाहेरील तालुक्यातील लोकप्रतिनिधी आपला तालुका कमी पडतोय की काय तर, ते पेण तालुक्यात भंगारसारख्या अवैध धंद्याला खतपाणी घालताना दिसतात. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा अवैध धंदा सुरू आहे, त्यांनी वेळोवेळी याबाबत अनेकदा पोलिसांकडे तक्रार देऊनसुद्धा काहीच उपयोग झालेला नाही. नसिमसारखा परप्रांतीय राजरोसपणे भंगारचा अवैध धंदा चालवत असेल, तर त्याला बळ देणारे हे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, एवढे नक्की.

येत्या हिवाळी अधिवेशनात महामार्गावरील अवैध धंद्यांचा लेखाजोखा मांडला जाईल, एवढे नक्की. त्याअगोदर या लोकप्रतिनिधींनी आपला आशीर्वाद या अवैध धंद्यावरून काढला तर ठीकअन्यथा या लोकप्रतिनिधीच्या पेण तालुक्यातील हस्तक्षेपावर बॅनरबाजी झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अवैध धंद्यांना खतपाणी घालणार्‍या सत्ताधारी आमदाराचे प्रगती पुस्तक पाठवणार एवढे नक्की. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये रिक्षावाल्यांनी या आमदाराला असा काही पछाडलाय की निवडणुकीमध्ये झालेला खर्च काढण्याचा हा मार्ग तर या लोकप्रतिनिधींनी निवडला तर नाही ना? अशी चर्चा दबक्या आवाजात पेण तालुक्यात सुरू आहे.

Exit mobile version