बेकायदा माती डेब्रिज भराव

। पालघर । प्रतिनिधी ।

मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा माती भराव केला जात आहे. बेकायदा माती वाहतूक करणार्‍या डंपरमधून रस्त्यावर माती, चिखल पडून धूळ उडत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले असून पर्यावरणाचे देखील नुकसान होत आहे. बेकायदा वाहतूक करणार्‍या डंपरवर महापालिका, वाहतूक पोलीस व महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे.

मीरा- भाईंदर शहरात अनेक ठिकाणी मोठ मोठ्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. तसेच, शहरात अनेक ठिकाणी जागा सपाट करण्यासाठी जागा बेकायदा माती भराव केला जात आहे. मीरा रोड पूर्वेला मोठ्या प्रमाणात माती भराव केला जात आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. माती भराव करण्यासाठी शहरात रात्रंदिवस शहराबाहेरून डंपर बेकायदा माती, इमारतीतून निघालेला राडारोडा, चिखल वाहतूक करुन आणला जात आहे. या डंपरमधून वाहतुकीच्या रस्त्यावर माती, चिखल सांडत असल्याने शहरात मातीचा धुराळा उडत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून अनेक अपघात देखील होत आहेत. हे डंपर भर नागरी वस्त्यांतून भरधाव वेगाने ये-जा करत असल्याने त्याचा त्रास तेथील रहिवाशांसह पादचार्‍यांना होत आहे. महसूल विभागाच्या डोळ्यादेखत अनेक ठिकाणी बेकायदा माती भराव होत असताना त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version